कल्याण मारहाण प्रकरण: मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक

Akhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) अटक करण्यात आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 20, 2024, 05:24 PM IST
कल्याण मारहाण प्रकरण: मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक title=

Akhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) अटक करण्यात आलं आहे. व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिल्यानंतर अखिलेश शुक्लाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण तापलं होतं आणि तेव्हापासून अखिलेश शुक्ला गायब झाला होता. अखेर दोन दिवसांनी तो समोर आला असून व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं. दरम्यान याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

नेमकं घडलं काय?

कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस इमारतीत बुधवारी झालेल्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या हाय प्रोफाईल इमारतीत अखिलेश शुक्ला हा अधिकारी वास्तव्यास आहे. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री अखिलेश शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. शुक्ला याने आपल्या मित्रांना बोलावून अभिजीत देशमुख यांना मारहाण केली. या वादात हस्तेक्षेप करण्यास गेलेल्यांनाही शुक्लाने मारहाण केली. या प्रकरणावरुन संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यावरुन निवेदन केलं आहे.

मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाचं स्पष्टीकरण, म्हणतो 'आम्ही अमराठी...'

 

फडणवीसांकडून निलंबनाची घोषणा

"अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असा उल्लेख केला आणि त्यातून संतापाची लाट लोकांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्ला हा एमटीडीसीमधे काम करणारा व्यक्ती आहे. त्याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे," अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. पुढे बोलताना फडणवीसांनी, "जे माज करतात त्याचा माज उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठी माणूस कुणाच्या काळात बाहेर गेला? वसई विरारला कोणाच्या काळात मराठी माणूस गेला याचा शोध घ्यायला हवा," असा टोलाही लगावला.

'मराठी माणसं भिकारी, यांना मारा', कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसाला मारहाण; 10 ते 15 जणांसह सोसायटीत राडा

अखिलेश शुक्लाचं स्पष्टीकरण

"दोन दिवसांपासून माझ्या संबंधी प्रकरण व्हायरल होत आहे. नेमकं काय झालं आहे मला सांगायचं आहे. एक वर्ष आधी मी माझ्या घराच्या इंटिरिअरचं काम केलं. यावेळी मी माझा शू रॅक उजव्या बाजूला घेतला. यावर देशमुख, काळवीट्टे कुटुंब यांनी आक्षेप घेतला. ते आम्हाला एका वर्षापासून त्रास देत होते. आम्ही हा तोडून फेकू अशी धमकी देत होती. माझ्या बायकोलाही ते त्रास देत होते. शिवीगाळ करत होते. मी ऑफिसमधून आल्यानंतर पत्नी मला याबाबत सांगायची. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो," असा दावा अखिलेश शुक्लाने केला आहे. 

"परवा माझ्या बायकोने घराबाहेर धूप लावला होता. काळविट्टे कुटुंबाने यावर आक्षेप घेतला. आम्ही तुम्हाला येथे राहू देणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांनी माझ्या बायकोला शिवीगाळ केला. मी आल्यावर वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर देशमुख कुटुंब आलं आणि बायकोला शिवीगाळ केली. त्यांनी जोरजोरात दरवाजा आपटला आणि बायकोचे केस ओढून कानाखाली मारली. मी सोडवण्याचा प्रयत्न केला असता मलाही शिवीगाळ कऱण्यात आली," असाही त्याचा दावा आहे. 

"व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात भांडण दिसत आहे. पण त्याआधी काय घडलं हे कोणाला माहिती नाही. देशमुख कुटुंब एक वर्षांपासून त्रास देत होते. माझ्या मराठी मित्रांनी मला सहकार्य केलं आणि वाचवलं. आमची पाचवी पिढी महाराष्ट्रात असून, आम्ही अमराठी आहोत असं कधी वाटलं नाही. त्यांनीच आम्हाला तुम्ही भय्या आहात, आम्ही तुमचं काय करतो पाहा अशी धमकी दिली. त्यानंतर माझ्या मराठी मित्रांनी मला वाचवलं. मीदेखील महाराष्ट्रीयन आहे. मी स्वतःला मराठी भाषिक समजतो," असंही त्याने म्हटलं आहे. 

शुक्ला याने यावेळी आपल्या जुन्या शेजारीपणाच्या वादाला राजकीय वळण देण्याच्या प्रयत्नांचा निषेध केला. त्याने या घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी केली आहे.