नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'भजी विक्री हा सुद्धा रोजगार आहे', अशा आषयाच्या विधानावर काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भजी विक्री हा जर जॉब असेल तर, भिक मागणे हासुद्धा रोजगार आहे, असा टोला चिदंबरम यांनी मोदींना लगावाला आहे.
सरकारने केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अर्थमंत्री चिदंबरम यांनी रविवारी जोरदार निशाणा साधला. चिदंबरम म्हणाले भजी विक्रीला जर जॉब म्हणून सांगितले जात असेल तर, भिक मागण्यालाही रोजगाराच्या दृष्टीनेच पहायला पाहिजे. रोजगार निर्मिती करण्यात सरकार पुरते अपयशी ठरल्याचे सांगत चिदंबरम यांनी एकामागून एक अशी ट्वीट केली आहेत.
आपल्या एका ट्विटमध्ये चिदंबरम यांनी म्हटले आहे की, 'पंतप्रधान मोदी म्हणतात की, भजी विकणे हा सुद्धा जॉब आहे. असाच जर तर्क लावायचा तर, भिक मागणे हा सुद्धा जॉबच आहे, असे म्हणायला हवे. गरीब आणि असक्षम लोकांनाही रोजगार मिळालेल्या लोकांमध्ये गणायला हवे. ज्यांना मजबूरीमुळे भिक मागून जीवन जगावे लागते आहे', असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
5. Even selling pakodas is a 'job' said PM. By that logic, even begging is a job. Let's count poor or disabled persons who are forced to beg for a living as 'employed' people.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 28, 2018
पंतप्रधान मोदींनी १९ जानेवारीला वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत प्रश्नार्थक स्वरूपात दिलेल्या उत्तरात म्हटले होते, 'जर एखादा व्यक्ती भजी विकत असेल आणि तो जर संध्याकाळी २०० रूपये घेऊन घरी येत असेल तर, त्याला तुम्ही रोजगार म्हणणार की नाही?'