नवी दिल्ली : सेन्सॉर बोर्डानं परवानगी देऊनही विविध राज्यांमध्ये घातलेल्या बंदी विरोधात 'पद्मावत' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
सुप्रीम कोर्टानंही पद्मावतच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारांच्या बंदीच्या निर्णयाचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. भाजपशासित गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे निर्मात्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसाव लागू शकतं. त्यामुळेच निर्मात्यांनी या बंदीच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पद्मावत 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.