'अमित शाह, जनरल नरवणेंना अटक करा' पाकिस्ताननं तोडले अकलेचे तारे

पाहा पाकिस्तानने कोणाकडे केली आहे ही बालिश मागणी

Updated: Jan 21, 2022, 08:27 PM IST
'अमित शाह, जनरल नरवणेंना अटक करा' पाकिस्ताननं तोडले अकलेचे तारे  title=

नवी दिल्ली : काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यानं तोंडावर आपटणा-या पाकिस्ताननं आणखी एक बालिश खोडसाळपणा केला आहे. तुर्कीच्या मदतीनं थेट भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि लष्कप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना अटक करण्याची मागणी ब्रिटनकडे केली आहे. 

ब्रिटनमधील स्टोक व्हाईट या लॉ फर्मनं लंडन पोलिसांना एक अहवाल दिलाय. या अहवालात काश्मीरमधील २ हजार नागरिकांचा जबाब नोंदवल्याची माहिती आहे. यात भारत युद्धगुन्हे आणि हिंसा करत असल्याचा दावा करण्यात आलाय.  लंडन पोलिसांच्या अंतर्गत वॉर क्राईम्सचा तपास करणाऱ्या विभागालाही अहवाल सोपवण्यात आला आहे.
 
काश्मीरमधील या कथित गुन्ह्यांची चौकशी करून शाह आणि नरवणेंना अटक करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही लॉ फर्म तुर्कीमधील काही अधिकाऱ्यांशी संबंधित आहे आणि हे अधिकारी पाकिस्तानसाठी काम करतायत. 

भारताच्या अंतर्गत विषयात परकीय हस्तक्षेप व्हावा, यासाठी पाकिस्तानचा हा आटापिटा सुरू असल्याचं स्पष्ट आहे. अर्थात, त्यांच्या या बालिश बडबडीला ब्रिटन फारसं महत्त्व देण्याची शक्यता नाही. त्यामुळेच लंडन पोलिसांकडून भारताला याबाबत अद्याप काहीही कळवण्यात आलं नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिलीये. 

स्टोक व्हाईटनं सादर केलेला अहवाल पाकिस्तानधार्जिणा असल्याचं त्यातल्या एका वाक्यावरूनच समजतं. यात लष्कर ए तोयबाचा अतिरेकी झिया मुस्तफा याचा उल्लेख स्वातंत्र्यसेनानी असा करण्यात आलाय. मात्र पाकिस्ताननं कितीही आदळआपट केली, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. यावेळीही आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा पाकिस्तान आणि इम्रान खान तोंडघशी पडणार हे नक्की.