India Rank in Passport Index: 'पासपोर्ट इंडेक्स'चा (Passport Index) नवा अहवाल बुधवारी प्रकाशित झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नव्या अहवालामध्ये भारताचा मोबिलिटी स्कोअर फार कमी झाला आहे. जागतिक स्तरावरील आढावा घेतल्यास यंदाच्या वर्षी कोणत्याही देशापेक्षा भारताचा मोबिलिटी स्कोअर सर्वाधिक पडला आहे. सध्या हा स्कोअर 70 इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा स्कोअर 3 अंकांनी कमी झाला आहे. मागील वर्षी भारत पासपोर्ट रॅकिंगमध्ये 138 व्या स्थानी होता. यंदा भारत 144 व्या स्थानावर आहे. नवीन रॅकिंग सिस्टीमनुसार या इंडेक्समध्ये 'टाइमशिफ्ट' हे फिचर जोडण्यात आलं आहे. या नव्या फिचरमध्ये पासपोर्टला दिले जाणारे गुण हे मागील अनेक वर्षांपासूनची कामगिरी पाहून दिले जातात. याच एका मुख्य कारणामुळे भारताला फटका बसला आहे. कोरोनाच्या आधी भारताच्या पासपोर्टची जी पत होती त्याहूनही अधिक खाली सध्या भारतीय पासपोर्टचा दर्जा घसरला आहे.
दुसऱ्या बाजूला भारताच्या पासपोर्टची पत युरोपीयन देशांनी स्वीकारलेल्या नवीन धोरणांमुळे घसरल्याचं बोललं जात आहे. युरोपीयन देशांच्या नव्या धोरणांमुळे 2023 पासून सर्बियासारख्या देशांमध्ये जाण्यासाठी भारतीयांना व्हिजाची बंधनकारक करण्यात आला आहे. या पासपोर्ट इंडिक्समध्ये चीनलाही मोठा फटका बसला आहे. अमेरिका आणि जर्मनीसारख्या देशांच्या तुलनेत चीनची कामगिरी फारच सुमार आहे. या यादीमध्ये चीन हा 118 व्या स्थानी आहे. युरोपीयन युनियनबरोबरच भारत आणि जपानसारख्या प्रभावशाली देशांबरोबर मोफत व्हिजा धोरण चीनने स्वीकारलेलं नाही. त्याचाच चीनला फटका बसला आहे.
"अनेक देशांमध्ये कोरोना साथीच्या कालावधीमध्ये व्हिजाचे नियम कठोर करण्यात आळे होते. मागील 2 वर्षांमध्ये हे नियम शिथिल करण्यात आळे. त्यामुळे अनेक देशांचा मोबिलिटी स्कोअर वाढला. मात्र यंदा फारशी शिथिलता देण्यात आलेली नाही. चीन आणि भारतही या यादीमध्ये फारच खालच्या बाजूला आहे. दोन्ही देशांची मोबिलिटी फारच कमी आहे. मात्र चीनने आता आपल्या सीमा उघडल्या असून त्याचा परिणाम या आकडेवारीत दिलेला नाही," असं 'पासपोर्ट इंडेक्स'चे सहसंस्थापक हंट बोगोसियन म्हणाले.
आशियामधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये दक्षिण कोरिया आघाडीवर आहे. या यादीमध्ये दक्षिण कोरिया 12 व्या स्थानी असून या देशाचा मोबिलिटी स्कोअर 174 इतका आहे. त्या खालोखाल 26 व्या स्थानी 172 च्या मोबिलिटी स्कोअरसहीत जपान आहे. यंदाच्या अहवालामध्ये केवळ 10 देशांना आपला मोबिलिटी स्कोअर सुधारता आला आहे. यामध्ये स्वीडनने पहिलं स्थान पटकावलं असून मागील वेळेस अव्वल स्थानी असलेला जर्मनी सध्या दुसऱ्या स्थानी आहे. ज्या देशांचा मोबिलिटी स्कोअर वाढला आहे त्यापैकी 40 टक्के हेश हे आफ्रिकेतील आहेत.