BJP MLA Obscene Video: त्रिपुरामधील विधानसभेच्या अर्थसंकल्पीय सत्रादरम्यान सभागृहाचं कामकाज सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीचा एक आमदार (Tripura BJP MLA) अश्लील व्हिडीओ पाहत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ त्रिपुरा विधानसभेमधील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपाच्या आमदारावर टीका होताना दिसत आहे. संबंधित व्हिडीओमध्ये दिसणारा आमदार बागबासा मतदारसंघाचं (Bagbasa Constituency) विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे जादव लाल नाथ (Jadab Lal Nath) असल्याचं सांगितलं जात आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी या व्हायरल व्हिडीओसंदर्भात दिलेल्या वृत्तांनुसार, ईशान्य भारतामधील या राज्यातील विधानसभेमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पासंदर्भात चर्चा सुरु होती त्यावेळी हा प्रकार घडला. जादव लाल नाथ यांच्या मागील आसनांवर बसलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांचा हा अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेटवर चर्चा सुरु असताना अश्लील व्हिडीओ पाहतानाचा व्हिडीओ शूट केला.
सभागृहामध्ये अध्यक्ष आणि इतर उपस्थित आमदार चर्चा करण्याचे आवाज येत असतानाच दुसरीकडे जादव लाल नाथ हे आपल्या मोबाईल स्क्रीनवर व्हिडीओच्या क्लिप्स स्कोअल करताना दिसत आहेत. अचानक एखाद्या व्हिडीओवर थांबून ते अश्लील वाटणारे व्हिडीओ पाहताना या क्लिपमध्ये दिसत आहे. पक्षाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाने या आमदाराकडून संबंधित प्रकरणाबद्दल स्पष्टीकरण मागवलं आहे. याबद्दलची नोटीसही आमदाराला पाठवण्यात आल्याचं समजतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर होणाऱ्या बदनामीनंतरही जादव लाल नाथ यांनी समोर येऊन या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
घडलेला प्रकार आणि या व्हायरल झालेल्या व्हिडीओची चर्चा सुरु झाल्यानंतर सत्रातील दिवसाचं कामकाज संपल्यानंतर जादव लाल नाथ ते लगेच विधानसभेच्या आवारातून निघून गेल्याचे समजते. अशाप्रकारे भाजपाच्या एखाद्या लोकप्रतिनिधीने सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडीओ पाहण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2012 साली असाच प्रकार घडला होता.
2012 मध्ये कर्नाटकमधील भाजपाच्या तत्कालीन सत्ताधारी सरकारमधील 2 मंत्री राज्यच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आपल्या स्मार्टफोनवर अश्लील व्हिडीओ क्लिप पाहत असल्याचं समोर आलं होतं. यानंतर या दोघांनाही राजीनामा द्यावा लागला होता. मात्र चौकशीनंतर दोन्ही मंत्र्यांना निर्दोष मुक्त करण्यात आल्यानंतर लक्ष्मण सावदी आणि सी. सी. पाटील यांना पुन्हा पक्षात स्थान देण्यात आलेलं.