अलवर : गो-तस्करीच्या संशयावरून सामूहिक हत्येचा बळी ठरलेल्या पहलू खान याच्या हत्या प्रकरणातील सर्व म्हणजेच सहाही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलीय. अलवर जिल्हा न्यायालयानं बुधवारी हा निर्णय सुनावलाय. अलवरमध्ये जवळपास दोन वर्षांपूर्वी १ एप्रिल २०१७ रोजी पहलू खान याची गोतस्करीच्या संशयावरून कथित गोरक्षकांच्या जमावाकडून मारहाण करण्यात आली होती. डेअरी व्यावसायिक असलेल्या पहलू खानचा मारहाणीनंतर दोन दिवसांनी मृत्यू झाला होता. यानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींसह एकूण नऊ आरोपींना पकडण्यात आलं होतं. परंतु, संशयाचा लाभ देत न्यायालयानं या आरोपींना क्लीन चिट दिलीय. या प्रकरणात समोर आलेल्या व्हिडिओत आरोपींचा चेहरा दिसत नाही तसंच पहलू खान याच्या मुलांच्या जबाबालाही महत्त्व देण्यात आलं नाही.
एप्रिल २०१७ मध्ये हरियाणाच्या जयसिंहपुराचा रहिवासी असलेला पहलू खान आपल्या मुलांसहीत आणि भाच्यांसहीत हटवाडाहून गायींना दोन गाड्यांमध्ये घेऊन आपल्या गावी निघाला होता. रस्त्यातच कथित गोरक्षकांनी त्यांचा रस्ता अडवत गोतस्करीच्या संशयावरून त्यांना मारहाण केली. यामध्ये पहलू खान गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणात बहरोडचा रहिवासी विपिन यादव, कालूराम, दयानंद, रविंद्र कुमार, योगेश कुमार, भीम राठी आणि दीपक उर्फ गोलू यांना अटक केली होती. तसंच यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचाही समावेश होता.
अलवर जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयावर पहलूचा मुलगा इरशाद यानं निराशा व्यक्त केलीय. आपण न्यायासाठी वरिष्ठ न्यायालयात जाणार असल्याचं त्यानं म्हटलंय.