Haunted Road: 'हे' आहेत भारतातील झपाटलेले रस्ते! येथे लोकं दिवसाही जात नाही

भारतातील काही रस्त्यांबाबत अशाच रंजक गोष्टी सांगितल्या जातात. या रस्त्यांवर भुताटकी असल्याचं सांगत अनेक जण दिवसाही या रस्त्यांवर फिरकत नाहीत. 

Updated: Jul 6, 2022, 02:46 PM IST
Haunted Road: 'हे' आहेत भारतातील झपाटलेले रस्ते! येथे लोकं दिवसाही जात नाही title=

India Haunted Road: भूत प्रेत या काल्पनिक गोष्टी असूनही अनेकांच्या मनात लहानपणापासून भिती करून आहेत. एखादी वास्तू किंवा रस्त्यावर भुताटकी असल्याच्या गोष्टी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरवल्या जातात. मात्र अशा गोष्टींमध्ये कोणतंच तथ्य नसते. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो आणि काळानुसार त्यात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होत असतो. भारतातील काही रस्त्यांबाबत अशाच रंजक गोष्टी सांगितल्या जातात. या रस्त्यांवर भुताटकी असल्याचं सांगत अनेक जण दिवसाही या रस्त्यांवर फिरकत नाहीत. यात काही तथ्य नसलं तरी लोकं या गोष्टी खऱ्या असल्याचं मानतात आणि तिथे जाणं टाळतात. भारतातील अशाच काही रस्त्यांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जिथे लोकं दिवसाही जात नाहीत.

झारखंडची राजधानी रांची आणि जमशेदपूर यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-33 वर असे अनेक अपघात झाले आहेत. यामागे भूत असल्याची भाकड गोष्ट लोक सांगतात. काही लोकांच्या मते हा रस्ता शापित आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला मंदिर असून वाहनचालकाने दोन्ही मंदिरात थांबून प्रार्थना केली नाही तर त्याच्या वाहनाचा अपघात होतो, असा समज आहे. हे गोष्ट विचित्र असली तरी लोकांचा विश्वास आहे की ते खरे आहे.

भानगड किल्ला भारतातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक मानला जातो. या कारणास्तव दिल्ली-जयपूर महामार्ग देखील शापित मानला जातो. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की या रस्त्यावर अनेक भयावह गोष्टी होतात, ज्याचे वर्णन करणे कठीण आहे.  किल्ल्याजवळून जाताना नकारात्मक ऊर्जा आणि विचित्र गोष्टी जाणवतात, असं लोकांचं म्हणणं आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भुताटकी असल्याचा लोकांचा समज आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण रात्रीच्या वेळी भीतीदायक बनते, असं लोकांचं सांगणं आहे. रात्रीच्या वेळी एक महिला येथून जाणारी वाहने थांबवते आणि गाडी न थांबवता निघून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचा अपघात होतो, असे लोकांचे म्हणणे आहे.

तामिळनाडूतील सत्यमंगलम वन्यजीव अभयारण्यातून जाणाऱ्या महामार्गही झपाटलेले असल्याचं लोक मानतात. या रस्त्यावरून जाताना अनेकवेळा अनोळखी व्यक्तींचा आवाज ऐकू येतो. तसेच प्रकाशही पाहिल्याचे लोक सांगतात. मात्र, याचा कोणताही पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. या जंगलात दरोडेखोर वीरप्पन देखील राहत होता, ज्याला नंतर पोलिसांनी मारले होते.

दिल्ली कँट रोडही पछाडल्याचं असल्याचं लोकं म्हणतात. इथून प्रवास करणारे लोक असा दावा करतात की, या रस्त्यावर पांढऱ्या साडीतील महिलेचे भूत फिरते. या रस्त्यावर एक महिला लिफ्ट मागते आणि गाडी न थांबवल्यास गाडीसोबत पळू लागते. मात्र, याबाबत कोणताही पुरावा नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)