PM Modi Birthday : 'या' हॉटेलमध्ये 40 मिनिटांत फस्त करा '56 इंच मोदी जी' प्लेट, मिळवा 'इतक्या' लाखांचं बक्षीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या वाढदिवस आहे, या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे  

Updated: Sep 16, 2022, 06:46 PM IST
PM Modi Birthday : 'या' हॉटेलमध्ये 40 मिनिटांत फस्त करा '56 इंच मोदी जी' प्लेट, मिळवा 'इतक्या' लाखांचं बक्षीस title=

PM Modi Birthday : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उद्या (17 सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी केलीय. भाजपने (Bjp) 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात बूथ स्तरावर जाऊन 'सेवा पंधरवडा' अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून म्हणजेच 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत भाजपचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधतील. तसंच देशातील प्रत्येक जिल्ह्यात समाजसेवेशी संबंधित कार्यक्रम आयोजित केलं जाणार आहे.

दरम्यान, दिल्लीतल्या एका हॉटेलने पंतप्रधान मोदींचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजकरा करण्याचं ठरवलं आहे. दिल्लीतल्या कनॉट प्लेस (Delhi Connaught Place) इथं असलेल्या ARDOR 2.0 या हॉटेलने वाढदिवसाचं औचित्य साधत 56 व्यंजनांची स्पेशल थाळी तयार केली आहे. पंतप्रधानांच्या वाढिदिवशी ही थाळी लाँच केली जाणार आहे. 

ग्राहकांना या थाळीत व्हेज आणि नॉनव्हेज (Veg - Non Veg) असे दोनही पर्याय असणार आहेत. सुमित कालरा असं हॉटेल मालकाचं नाव आहे. पंतप्रधान मोदी हे आपल्या देशाचा गौरव आहेत, त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी अनोखी भेट देण्याचा निश्चय केल आहे. यासाठी ही भव्य थाळी लाँच करणारआहे. या थाळीला '56 इंच मोदीजी' थाळी असं नाव देण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या हॉटेलमध्ये येऊन या थाळीचा स्वाद घ्यावा अशी इच्छा सुमित कालरा यांची आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव ते येऊ शकणार नाहीत. त्यामुळे जनतेसाठी सुमित कालरा यांनी ही थाळी ठेवली आहे. विशेष म्हणजे ही थाळी जेवणाऱ्याला खास बक्षीसही मिळणार आहे. '56 इंच मोदीजी' थाळी जो 40 मिनिटात पूर्ण संपवेल त्याला तब्बल 8.5 लाख रुपये मिळणार आहे. याशिवाय 17 ते 26 सप्टेंबरदरम्यान या हॉटेलमध्ये येऊन ही थाळी जेवतील त्यातल्या भाग्यशाली विजेत्या जोडीला केदारनाथ यात्रेचं तिकिट दिलं जाणार आहे. केदारनाथ हे ठिकाणी पंतप्रधान मोदींचं आवडत ठिकाण आहे.