राम मंदिराचे भूमिपूजन हा माझ्यासाठी अत्यंत भावूक क्षण- लालकृष्ण अडवाणी

राममंदिर हे भारतासाठी सामर्थ्य, समृद्धी आणि सर्वांना न्याय देणाऱ्या सौहार्दपूर्ण राष्ट्राचे प्रतिक ठरेल. 

Updated: Aug 4, 2020, 11:12 PM IST
राम मंदिराचे भूमिपूजन हा माझ्यासाठी अत्यंत भावूक क्षण- लालकृष्ण अडवाणी title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराची कोनशिला रचली जाण्याचा क्षण केवळ माझ्यासाठीच नव्हे तर समस्त भारतीयांसाठी एक भावूक क्षण असेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली. तसेच राममंदिर आंदोलनात नियतीने माझ्याकडून महत्त्वपूर्ण भूमिका बजावून घेतली यासाठी मी ऋणी असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.

अयोध्येत बुधवारी होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. कोरोनाच्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राममंदिर आंदोलनातील फायरब्रँड नेते असणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रतिक्रियेविषयी सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर भूमिपूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, राममंदिर हे भारतासाठी सामर्थ्य, समृद्धी आणि सर्वांना न्याय देणाऱ्या सौहार्दपूर्ण राष्ट्राचे प्रतिक ठरेल. 

अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी, या मागणीसाठी लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्य अशी रथयात्रा काढली होती. यानंतर देशभरात राममंदिराचे आंदोलन तापले होते. याचीच परिणती म्हणून डिसेंबर १९९२ मध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली होती. या सगळ्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक हिंदुत्त्ववादी नेत्यांवर खटला दाखल करण्यात आला होता. नंतरच्या अडवाणी यांनी बाबरी मशिदीचे पतन हा आपल्या आयुष्यतील सर्वात दु:खद दिवस असल्याचे म्हटले होते. मात्र, यानंतरही राममंदिर आंदोलनातील प्रमुख नेते म्हणून अडवाणी यांची तयार झालेली प्रतिमा शाबूत राहिली होती. लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या आत्मचरित्रात राममंदिराचा संघर्ष म्हणजे अस्सल निधर्मीवाद आणि pseudo-secularism यामधील द्वंद्व असल्याचे म्हटले होते.