नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी परकीय आणि देशांतर्गत गुंतवणूक वाढवण्यावर भर द्या, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे. दिल्लीत गुरुवारी यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अमित शहा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासह केंद्रातील अत्यंत वरिष्ठ पातळीवरील अधिकारी उपस्थित होते.
कोरोना संकट । आर्थिक धोरणावर राहुल गांधी - रघुराम राजन यांच्यात संवाद
या बैठकीत लॉकडाऊन संपल्यानंतर अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल, याबाबत बराच खल झाला. यावेळी मोदींनी परकीय किंवा देशांतर्गत गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी गुंतवणूकदारांच्या समस्या तातडीने सोडवणे आणि केंद्र व राज्य सरकारांकडून त्यांना वेळेत सर्व परवानग्या मिळवण्यासाठी मदत करावी, असे मोदींनी सांगितले. याशिवाय, खाण उद्योगात रोजगार वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देता येईल का, याचाही मोदींनी आढावा घेतला.
देशातील लघू आणि मध्यम उद्योगांना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसेल, असा अंदाज आहे. त्यामुळे सरकार या क्षेत्रासाठी काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पार पडलेली बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
देशातील सध्याच्या औद्योगिक जमिनी आणि वसाहतींमध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीला चालना देऊन त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता यावे, यासाठी विशेष उपाययोजना करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
तसेच संरक्षण क्षेत्रात मेक इंन इंडियाला चालना देणे आणि स्टेट ऑफ आर्ट तंत्रज्ञानासोबत संरक्षण क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यावरही भर देण्याची सल्लाही मोदींनी उपस्थितांना दिला.