कोरोना लसीच्या स्थितीबाबत पंतप्रधान मोदींचा हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे दौरा

कोरोनाची लस देशात तयार करण्यासाठी सुरु आहेत प्रयत्न

Updated: Nov 28, 2020, 07:41 PM IST
कोरोना लसीच्या स्थितीबाबत पंतप्रधान मोदींचा हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे दौरा

पुणे : सध्या जगात सगळ्यांना कोरोना लस कधी तयार होणार याची प्रतिक्षा आहे. भारतात देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने भारतात कोरोनाची लस लवकरात लवकर तयार करण्यासाठी सर्व शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीसाठी देशातील तीन महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. तेथे कोरोनावर लस शोधण्याचं काम सुरु आहे. या कंपन्यांची गणना केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वोच्च कंपन्यांमध्ये केली जाते. या कंपन्यांनी यापूर्वी देखील बर्‍याच रोगांच्या लसी तयार केल्या आहेत. पीएम मोदी यांनी आज अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे भेट दिली.

झायडस कॅडिला कंपनी अहमदाबाद येथे आहे. झायडस कॅडिला ही एक मोठी औषध निर्माण करणारी संस्था आहे. देशातील इतर कंपन्यांप्रमाणे झायडस ही कोरोनावर लस तयार करण्यात गुंतली आहे. यापूर्वी झायडस कॅडिला कंपनीने जाहीर केले की त्याच्या लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ऑगस्टमध्ये त्यांनी लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा सुरू केला. आता कंपनी तिसर्‍या टप्प्यातील चाचणीची तयारी करत आहे. आतापर्यंतच्या अहवालानुसार झायडस कॅडिलाची लस आतापर्यंत 80% यशस्वी मानली गेली आहे.

झायडसने कोविड-19 वर लस तयार करण्यासाठी विराक, नॅशनल बायोफार्मा मिशन आणि केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाशी करार केला आहे. झायडस कॅडिला ही कंपनीची लस जायकोव डी नावाने येत आहे. झायडस कॅडिला 17 कोटी लस तयार करणार आहे. पुढच्या वर्षी मार्चपर्यंत झायडस कॅडिला ही कंपनी लस तयार करेल. पंतप्रधान मोदींनी शनिवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी लसीचे उत्पादन, साठवण, वितरण आणि लसच्या किंमत संबंधित बाबींवर चर्चा केली.