पीएम मोदी कोलकातामध्ये दाखल, 83 दिवसानंतर प्रथमच दिल्लीबाहेर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणी दौरा करणार

Updated: May 22, 2020, 11:31 AM IST
पीएम मोदी कोलकातामध्ये दाखल, 83 दिवसानंतर प्रथमच दिल्लीबाहेर title=

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये अम्फान या चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणी दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत. गेल्या 283 वर्षातील हे सर्वात भयंकर वादळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अम्फान बाधित भागाची हवाई पाहणी करणार आहेत. पंतप्रधान मोदी कोलकाता येथे पोहोचले आहेत. तिथे ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. आता अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हवाई पाहणी करणार आहेत.

शुक्रवारी सकाळपर्यंत पश्चिम बंगालमध्ये अम्फानच्या वादळामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.

कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी 83 दिवसानंतर प्रथमच दिल्लीबाहेर दौर्‍यावर आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 25 मार्च रोजी देशभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती.

पीएम मोदींनी या दरम्यान काही ठिकाणी हजेरी लावली पण ते दिल्लीच्या बाहेर नाही गेले. लॉकडाऊनच्या काही दिवस आधीही पंतप्रधान मोदी दिल्लीबाहेर गेले नाहीत. त्यामुळे 83 दिवसानंतर ते दिल्लीच्या बाहेर आले आहेत.

अम्फानच्या वादळामुळे ओडिशामध्येही नुकसान झाले आहे. बंगालच्या तुलनेत तेथे कमी नुकसान झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटनुसार पीएम मोदी ओडिशामध्ये ही झालेल्या नुकसानीचा हवाई पाहणी करणार आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींना राज्यात येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही तासांनंतरच पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगाल दौरा करण्याचा निर्णय घेतला.

अम्फान वादळामुळे कोलकातामधील अनेक भागात पूर आला आहे. कोलकाता विमानतळावरही या वादळाचा परिणाम दिसून येतोय. इथे सर्वत्र पाणी आहे. रनवे आणि हँगर्स पाण्याखाली गेले आहेत. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगना, दक्षिण 24 परगना, मिदनापूर आणि कोलकाता येथे अम्फानचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला आहे.