लाल किल्ल्यावरून मोदींनी निवडणुकीचं बिगुल फुंकलं

काश्मीर प्रश्न सोडवायला 'गळाभेट'च रामबाण उपाय वाटते

Updated: Aug 15, 2018, 02:52 PM IST
लाल किल्ल्यावरून मोदींनी निवडणुकीचं बिगुल फुंकलं title=

नवी दिल्ली : २०१४ साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदी नेहमीच चर्चेत राहिलेत. आजही स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ते चर्चेत होते... चकचकत्या काळ्या रेंजरोव्हर गाडीतून मोदी लाल किल्ल्यावर पोहचले आणि त्यांच्या पेहरावानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गेल्या चार वर्षात मोदींचा लाल किल्ल्यावरचा पेहराव चर्चेचा मुद्दा असतो.

मोदींची फॅशन

यावेळेला त्यांनी बंधेज पद्धतीचा फेटा बांधला आणि पांढरा चुडीदार कुर्ता घातला होता. सोबत उपरणंही पांढरच होतं. गेल्या चार वर्षांत मोदींच्या बदलेल्या फेट्यांची रुपंही सोशल मीडियावर ट्रेन्ड झाली. यंदा त्यांनी भगवा आणि लाल रंगाचा तसंच अगदी लांब सोग्याचा फेटा बांधलेला... भाषण करताना या फेट्याला त्यांचा धक्का लागला आणि मोदींची ललाटरेषा जास्त खुली झाली. 

मोदी म्हणतात 'पूज्य बापूजी'

यंदाच्या भाषणात मोदींनी महात्मा गांधींचा उल्लेख 'पूज्य बापूजी' असा केलाच शिवाय तामिळमधली कविता ऐकवून उपस्थितांना चकित केलं.  

यावर्षीच्या २६ जानेवारीला मागच्या रांगेत बसलेले राहुल गांधी १५ ऑगस्टच्या आजच्या सरकारी कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसलेले दिसले. यानिमित्तानं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल यांची वाढलेली पत केंद्र सरकारनं मान्य केलीय असं म्हणायला हरकत नाही. मात्र, राहुल यांच्या गळाभेटीची खिल्ली उडवणाऱ्या मोदींना काश्मीर प्रश्न सोडवायला 'गळाभेट'च रामबाण उपाय वाटते. 

मोदींची लांबलचक भाषणं 

पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून केलेल्या आजवरच्या भाषणांपैकी २०१८ चं भाषण तिसरं सर्वाधिक मोठं भाषण आहे. २०१५ ला मोदींनी लाल किल्ल्यावरून तब्बल ९४ मिनिटं जनतेशी एकतर्फी संवाद साधला. लाल किल्ल्यावरच्या प्रत्येक भाषणानंतर बच्चे कंपनीशी संवाद साधण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. यंदाच्या भाषणाआडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी निवडणुकांचं बिगूल फुंकल आहे. आपल्या आवेशातून त्यांनी हेच दाखवून दिलं.