'द्वेषाची जागा आता..' शपथविधीनंतर नवाज शरीफांच्या टोमण्याला पंतप्रधान मोदींकडून 'अशा' शब्दात उत्तर

PM Narendra Modi to Nawaj Sharif:  पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाठवलेल्या शुभेच्छा आणि त्याला पंतप्रधान मोदींनी दिलेले उत्तर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.  

Pravin Dabholkar | Updated: Jun 10, 2024, 07:14 PM IST
'द्वेषाची जागा आता..' शपथविधीनंतर नवाज शरीफांच्या टोमण्याला पंतप्रधान मोदींकडून 'अशा' शब्दात उत्तर  title=
PM Narendra Modi to Nawaj Sharif

PM Narendra Modi to Nawaj Sharif: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला देशविदेशातील महत्वाचे नेते उपस्थित होते. तसेच इतर देशाच्या प्रमुखांनी पंतप्रधान मोदी यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदीदेखील सर्वांचे आभार मानत आहेत. या सर्वात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाठवलेल्या शुभेच्छा आणि त्याला पंतप्रधान मोदींनी दिलेले उत्तर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.  

 नवाझ शरीफ यांच्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले होते. 
 
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल तुमचे अभिनंदन, अशा शब्दात शाहबाज यांनी मोदींचे कौतुक केले. दरम्यान नवाज शरीफ यांनी शुभेच्छा देताना टोमणा मारण्याचा प्रयत्न केला. भारतात मोदी सरकार आल्यापासून मुस्लिमांवर अन्याय होत असल्याची टीका पाकिस्तानकडून केली जात असते. या पार्श्वभूमीवर नवाज शरीफ यांनी हे ट्विट केलाय.

काय म्हणाले नवाझ शरीफ?

तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल मोदी जी (@narendramodi) यांचे हार्दिक अभिनंदन." नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तुमच्या पक्षाला मिळालेले यश तुमच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दर्शवते. द्वेषाची जागा आशेने घेऊ आणि दक्षिण आशियातील दोन अब्ज लोकांचे नशीब घडवण्याच्या संधीचे सोने करूया, अशा शब्दात नवाज शरीफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

पंतप्रधान मोदींचे उत्तर 

नवाझ शरीफ यांच्या ट्विटल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच उत्तर दिले. भारतातील जनता नेहमीच शांतता, सुरक्षा आणि पुरोगामी विचारांच्या बाजूने राहिली आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. 

शपथविधी सोहळ्याला कोण होते उपस्थित?

शपथविधी सोहळ्याला शेजारील देशांचे नेते उपस्थित होते. रविवारी झालेल्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासह भारताच्या शेजारील देशांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, त्यांचे भूतानचे समकक्ष शेरिंग तोबगे आणि सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ हेही राष्ट्रपती भवनात झालेल्या भव्य समारंभात उपस्थित होते.

भारत-पाकिस्तानातील संबंध 

भारतीय संसदेने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केल्यानंतर इस्लामाबादने नवी दिल्लीशी आपले संबंध कमी केले. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध सामान्य राहिलेले नाहीत. पाकिस्तानशी  शेजाऱ्याप्रमाणे सामान्य संबंध हवे आहेत. चांगल्या संबंधांसाठी दहशतवाद आणि शत्रुत्वापासून मुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानला पार पाडावी लागेल, असेही भारताकडून वारंवार सांगण्यात येते.