Corona Vaccination : 2 डोस नंतरच रोगप्रतिकारक शक्ती वाढेल- पंतप्रधान

 पंतप्रधानाांनी कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्यकर्मचाऱ्यांचे आभार मानले. 

Updated: Jan 16, 2021, 10:50 AM IST
Corona Vaccination : 2 डोस नंतरच रोगप्रतिकारक शक्ती वाढेल- पंतप्रधान

नवी दिल्ली : कमी वेळात एक नव्हे तर दोन मेड इन इंडीया वॅक्सिन तयार झालंय. आणखी वॅक्सिनवर देखील काम सुरुय. हे भारतातील वैज्ञानिक यशस्विता दर्शवते.  शास्त्रज्ञ, वैज्ञानिकांच्या मेहनतीचे फळ आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात कोरोना वॅक्सिनेशनला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्यकर्मचाऱ्यांचे आभार मानले. 

ज्याला सर्वाधिक गरज त्याला सर्वात आधी लस देण्यात येईल. डॉक्टर्स, पॅरोमेडीकल फोर्स, रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी अशा सर्वांना लसीकरणासाठी प्राथमिकता असेल. सरकारी आणि खासगी दोन्ही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल. या सर्वांच्या वॅक्सिनेशनचा खर्च भारत सरकार करणार आहे. 

कोरोना लसीचे दोन डोस अतीशय गरजेचे आहेत. दोन डोस दरम्यान महिन्याचा कालावधी असेल. 2 डोस नंतरच रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. लसीकरण झाल्यानंतर सतर्कता बाळगा असे आवाहन करत पहिल्या डोसनंतर कोरोनाचे नियम विसरु नका असे ते म्हणाले.

लसीकरणासंदर्भात सर्व माहिती फोनवर मिळणार आहे. भारतीय वॅक्सीन विदेशी वॅक्सिनच्या तुलनेत खूप स्वस्त असल्याचे ते म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. इतिहासात एवढी मोठी लसीकरण मोहीम पहिल्यांदाच होतेय.