डाव्यांकडून केरळच्या संस्कृतीचा अनादर, मोदींनी 'शबरीमाला'वरच मौन सोडलं

शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच मौन सोडलं.

Updated: Jan 27, 2019, 09:37 PM IST
डाव्यांकडून केरळच्या संस्कृतीचा अनादर, मोदींनी 'शबरीमाला'वरच मौन सोडलं title=
फोटो सौजन्य : एएनआय

थ्रिसुर : शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच मौन सोडलं. शबरीमाला प्रकरणाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलं आहे. केरळमधील कम्युनिस्टांचं सरकार केरळमधील संस्कृतीचा कसा अनादर करतं, हे देश पाहतोय, अशी टीका पंतप्रधानांनी थ्रिसूरमधील जाहीर सभेत बोलताना केली. काँग्रेस किंवा कम्युनिस्टांना महिला सक्षमीकरणाची चिंता नाही. त्यांचा खरंच महिलांना सक्षम करायचं असतं तर त्यांनी तिहेरी तलाक बंद करण्याला विरोध केला नसता, असं मोदी म्हणाले.

ईव्हीएमवरून काँग्रेसवर निशाणा

साजिद सुजानं ईव्हीएम हॅकिंगप्रकरणी लंडनमध्ये घेतलेली पत्रकार परिषद आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी त्या पत्रकार परिषदेला लावलेली हजेरी यावरूनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. लंडनमधल्या पत्रकार परिषदेतून देशाच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केलेले पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. त्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचा बडा नेता होता. तुमच्यासाठी संस्था आणि लोकशाहीचा हाच आदर आहे का? असा सवालही मोदींनी उपस्थित केला.

'नंबी नारायण यांना अडकवलं'

दोन दशकांपूर्वी मेहनती आणि देशभक्त असलेले इस्रोचे वैज्ञानिक नंबी नारायण यांना चुकीच्या खटल्यामध्ये अडकवलं गेलं. यूडीएफच्या काही नेत्यांनी स्वत:च्या राजकारणासाठी देशाच्या हिताचं नुकसान केलं आणि एका शास्त्रज्ञाला त्रास दिला, असा आरोप मोदींनी केला. नंबी नारायण यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याची आमच्या सरकारला संधी मिळाली, असं विधान मोदींनी केलं.

भारताला मजबूत करण्यासाठी जी व्यक्ती योगदान देत आहे, त्यांचं महत्त्व आम्ही ओळखतो. त्यांच्यासाठी विज्ञान आणि त्याची हेटाळणी शत्रू राष्ट्रांना गुप्त माहिती पुरवणे अशी असू शकते, पण आमच्यासाठी विज्ञान हा राष्ट्रीय अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.

कोण आहेत नंबी नारायण?

नंबी नारायणन हे भारतीय अंतराळ संस्था 'इस्त्रो'चे निवृत्त वैज्ञानिक आहेत. नुकतंच त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्काराची घोषणा केली आहे. ऑक्टोबर १९९४ मध्ये मालदीवच्या मरियम राशिदा या महिलेला अटक तिरुअनंतपुरममध्ये अटक करण्यात आली होती. इस्त्रोच्या स्वदेशी क्रायोजनिक इंजिनच्या ड्राईंगची गुप्त माहिती पाकिस्तानाल पुरवल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबर १९९४ मध्ये तिरुअनंतपुरममध्ये क्रायोजनिक प्रॉजेक्टचे संयोजक डॉ. नंबी नारायणन यांना अटक करण्यात आली. नारायणन यांच्यासहीत आणखीन दोन वैज्ञानिक डी शशिकुमारन आणि के चंद्रशेखर यांनाही अटक झाली. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता.

नंबी नारायणन यांनी आपल्यावरचे आरोप चुकीचे असल्याचं अनेकदा सांगितलं. या प्रकरणाची चौकशी डिसेंबर १९९४ मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आली. सीबीआयनं हे आरोप फेटाळत क्लीन चीट दिली असली तरी तब्बल २४ वर्षांनी सर्वोच्च न्यायालयानं नारायणन यांना निर्दोष घोषित केलं. तसंच न्यायालयानं या निर्दोष वैज्ञानिकांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.