'मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..'

Modi Says No One Knew Mahatma Gandhi Before 1982 Film Thackeray Group Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत महात्मा गांधींसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अशातच आता ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 31, 2024, 07:36 AM IST
'मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..' title=
गंधींबद्दल केलेल्या विधानावरुन टीका

Modi Says No One Knew Mahatma Gandhi Before 1982 Film Thackeray Group Reacts: "पंतप्रधानपदावरून जाता जाता नरेंद्र मोदी यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडले आहेत. मोदींनी त्यांच्या चमच्या मुलाखतकर्त्यांनाच विचारले, ‘‘महात्मा गांधी कोण? रिचर्ड ऍटनबरो नामक हॉलीवूडवाल्या माणसाने गांधींवर चित्रपट काढल्यावर गांधी जगाला माहीत झाले. तोपर्यंत गांधी फारसे कुणाला माहीत नव्हते.’’ मोदी यांचे हे विधान हास्यास्पदच नाही, तर देशाची मान खाली आणणारे आहे," अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. "लोकसभा निवडणुकीत 400 पार होणे हे मोदींच्या पक्षासाठी फक्त भारताचे संविधान बदलण्यासाठीच नव्हे तर देशाचा इतिहास, रामायण, महाभारतही बदलण्यासाठी हवे आहे, असेच आता वाटते," असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

"मी गांधींच्या भूमीत म्हणजे माझ्या तीर्थक्षेत्री"

"गांधी ही आपल्या देशाची ओळख आहे व जगातील शांतता, अहिंसेचे, मानवतेचे ते सगळ्यात महत्त्वाचे प्रतीक आहे, पण मानवता व अहिंसेशी मोदी यांचे नाते नसल्याचा हा परिणाम आहे," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. अल्बर्ट आइनस्टाईन याने गांधींची भेट घेतली तेव्हा त्याला स्वर्ग दोन बोटे उरला. गांधीभेटीनंतर आइनस्टाईन म्हणतो, ‘‘अद्भुत माणूस! या पृथ्वीवर गांधींसारखा हाडामांसाचा एक माणूस जन्मास आला होता यावर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत.’’ मोदी साहेबांना अल्बर्ट आइनस्टाईनही माहीत नसावा. 1982 साली ‘गांधी’ चित्रपट प्रदर्शित झाला, पण त्याआधी जगभरात गांधी विचाराने क्रांती केली होती. अल्बर्ट आइनस्टाईन त्याच्या स्टडीरूममध्ये गांधींची तसबीर ठेवत असे व गांधी मला प्रेरणा देतात, असे तो जाहीरपणे सांगत असे. मार्टिन लुथर किंग यांना ज्युनिअर महात्मा गांधी म्हटले जात असे. मार्टिनदेखील त्याच्या स्टडीरूममध्ये गांधींची तसबीर ठेवत असत. 1956 मध्ये मार्टिन लुथर किंग यांनी भारत दौरा केला. भारतात पाऊल ठेवताच मार्टिन म्हणाले, ‘‘मी गांधींच्या भूमीत म्हणजे माझ्या तीर्थक्षेत्री आलोय.’’ ‘टाइम’ मॅगझिनच्या कव्हर पेजवर गांधीजी 1930 मध्ये प्रसिद्ध झाले व त्या वर्षीचे ‘पर्सन ऑफ द इयर’ बनले होते. 1931 मध्ये गांधीजी लंडनला गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी तेथे लाखोंचा जनसमुदाय हजर होता," अशी आठवण ठाकरे गटाने करुन दिली आहे.

टेबलवरील पुस्तकावरचे गांधीचे चित्र पाहून सफाई कर्मचारी म्हणाला...

"रामचंद्र गुहा यांनी 2013 साली गांधींचे चरित्र लिहिले. पुस्तकाच्या प्रचारासाठी ते अमेरिकेत गेले. हॉटेलातील खोली साफ करण्यासाठी आलेल्या सफाई कर्मचाऱ्याने टेबलावर पडलेल्या पुस्तकावरील चित्र पाहिले व विचारले, ‘‘हे तरुणपणीचे गांधी आहेत ना?’’ वकिली पोशाखातील गांधींना त्या कर्मचाऱ्याने ओळखल्याचे गुहा यांना आश्चर्य वाटले. तो कर्मचारी म्हणाला, ‘‘माझ्या देशात गांधींना खूप मान आहे.’’ गुहाने विचारले, ‘‘तुझा देश कोणता?’’ तो सफाई कर्मचारी म्हणाला, ‘‘डॉमनिक रिपब्लिक.’’ गांधींच्या काळात कदाचित डॉमनिक रिपब्लिक देशाचा उदयही झाला नसेल, पण डॉमनिक रिपब्लिकला गांधी माहीत आहेत," या किस्स्याचा उल्लेखही लेखात आहे.

'व्हाय नॉट गांधी डाइड यट?'

"जगाने दोन महायुद्धे पाहिली. विनाश आणि विध्वंसाचे राजकारण आजही सुरूच आहे. एका बाजूला गांधी तर दुसऱ्या बाजूला स्वार्थ, हवस, शस्त्रांची स्पर्धा आहे. भाषा, धर्म, वर्ण, कातडीचा रंग, विषमता यांचा झगडा जेव्हा मनुष्यतेच्या अंतापर्यंत घेऊन जातो, तेव्हा निराश, थकलेल्या मनाला गांधी विचार आशेची किरणे दाखवतो. मानवतेचा मार्ग खरा हा संदेश देतो. ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये चर्चिलचा पुतळा आहे तेथेच गांधीही उभे आहेत. नंग्या फकिरासारखे. याच नंग्या फकिराने ब्रिटिश साम्राज्य खिळखिळे केले. चर्चिलने युद्ध केले व खेळले ते साम्राज्य वाचविण्यासाठी. हाच तो चर्चिल, ज्याने बंगालचे सारे धान्य, तांदूळ ब्रिटनला मागवले व दोन दुष्काळात पाच लाख लोकांना भुकेने मारले. जेव्हा चर्चिलला या मृत्युकांडाची बातमी पोहोचली तेव्हा त्याने फाईलवर शेरा लिहिला, ‘‘व्हाय नॉट गांधी डाइड यट? इतके मेले, मग अद्यापि गांधी का मेला नाही?’’ पण गांधी मेले नाहीत. उलट गांधी संपूर्ण जगात पसरले. जगाच्या कानाकोपऱ्यात, हवेत आणि मातीत गांधी पोहोचले," असं लेखात म्हटलं आहे.

गांधी हे सत्यवादी होते तर मोदी हे असत्यवादी व थापेबाज आहेत

"जेव्हा मोदी त्यांच्या गावात मगरींशी खेळत होते तेव्हा जगातील बहुतेक देशांनी आपापल्या संसदेच्या प्रांगणात, सार्वजनिक ठिकाणी गांधीजींचे पुतळे बसवून त्यांना मानवंदना दिली होती. ज्या ब्रिटिशांना ‘चले जाव’चा आदेश गांधींनी दिला त्या ब्रिटिश पार्लमेंटच्या आवारात गांधींचा पूर्णाकृती पुतळा उभा आहे व तो त्यांच्यावरील चित्रपट येण्याआधीपासून आहे," असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे. "जगभरात गांधीजींच्या नावाने शेकडो संस्था उभ्या आहेत व गांधी विचार आणि कार्यावर आजही संशोधन सुरू आहे. मोदी यांनी एन्टायर पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर पदवी घेतली असल्याची थाप अमित शहा यांनी मारली, त्या एन्टायर पॉलिटिकल सायन्समध्ये गांधी असायलाच हवेत. नाही तर ती डिग्री खोटी आहे असे मानायला प्रमाण आहे. गांधी हे सत्यवादी होते तर मोदी हे असत्यवादी व थापेबाज आहेत. गुजरातच्या भूमीतून जसे गांधीजी निर्माण झाले, तसे महंमद अली जिना व नरेंद्र मोदी निर्माण झाले. औरंगजेबाचा जन्म तेथेच झाला. तुळशीत कधी भांगेची रोपटी उगवतात, पण गुजरातच नव्हे तर संपूर्ण भारत देश गांधींची भूमी म्हणूनच ओळखला जातो व मोदी यांच्यासारख्यांना ही प्रतिमा कधीच पुसता येणार नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

मोदींना रामायण, महाभारत माहीत नसावे कारण...

"आज ब्रिटन कमजोर झाला. ब्रिटनचा पंतप्रधान भारतीय वंशाचा. अमेरिकेची उपराष्ट्राध्यक्ष कमला भारतीय वंशाची. सर्व साम्राज्यवादी देशांत, ज्यांनी गांधींना नाकारले त्या देशांत गांधींचे पुतळे उभे आहेत. मोदी तेव्हा कोठेच नव्हते व आजही नाहीत. पुढच्या काळात मोदी व त्यांच्या लोकांचे नावही राहणार नाही, पण गांधी राहतील. गांधींच्या पुतळ्यांवर आणि तसबिरींवर गोळ्या चालविण्याचा उन्माद मोदींचे अंधभक्त दाखवतात, ही त्यांची विकृती. ओसामा बिन लादेनला लोक विसरून गेले. त्याच्या विकृतीचा अंत झाला. तसा या विकृतीचाही अंत होईल. गांधीजींनी स्वराज्य, सत्य, अहिंसा, मानवता यासाठी जीवन अर्पण केले. मोदी यांच्या मते देश 2014 साली स्वतंत्र झाला. त्याआधी हा देश नव्हता. त्यामुळे 1982 नंतर प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ चित्रपटानंतर त्यांना गांधी माहीत झाले. त्यांना रामायण, महाभारत माहीत नसावे. कारण ते स्वतःच देवाचे अवतार आहेत. गांधी हे भारतमातेचे महान पुत्र होते. हा फरक राहणारच. इतके प्रयत्न करूनही या सगळ्यांना गांधी मारता आले नाहीत. मोदी यांचे हेच दुःख आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.