सुनावणीदरम्यान अचानक Porn Video सुरु झाला अन्...; हायकोर्टातील धक्कादायक प्रकार

Porn Video Played In High Court: हायकोर्टामध्ये एका प्रकरणाची सुनावणी सुरु असतानाच अचानक हा अश्लील व्हिडीओ सुरु झाला. घडलेला प्रकार पाहून कोर्टाने कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 6, 2023, 01:10 PM IST
सुनावणीदरम्यान अचानक Porn Video सुरु झाला अन्...; हायकोर्टातील धक्कादायक प्रकार title=
सुनावणी सुरु असताना सुरु झाला व्हिडीओ (प्रातिनिधिक फोटो)

Porn video played in Karnataka high court: कर्नाटक हायकोर्टामध्ये एका प्रकरणाची सुनावणी सुरु असताना अचानक पॉर्न व्हिडीओ सुरु झाल्याने एकच खळबळ माजली. काही समाजकंटकांनी झूमच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या सुनावणीदरम्यान लॉग इन करुन हा गोंधळ घातला. न्यायालयीन सुनावणी सुरु असतानाच अचानक स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ सुरु झाला. या घटनेनंतर कोर्टाने संताप व्यक्त केला आहे. हायकोर्ट प्रशासनाने सायबर सुरक्षेच्या मुद्द्यावरुन चिंता व्यक्त केली. या अभूतपूर्व घटनेचा संदर्भ देत कर्नाटक हायकोर्टाने बंगळुरु, धारवाड आणि कालबुर्गीमधील खंडपीठांमधील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि लाइव्ह स्ट्रीमिंग सेवा अचानक स्थगित केली आहे.

कोर्टाचा संताप

घडलेल्या प्रकरणासंदर्भात हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. हायकोर्टातील कंप्युटर विंगच्या रजिस्टारने या प्रकरणामध्ये सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बेंगळुरुमधील सायबर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कोर्टाने जारी केलेल्या आदेशामध्ये, तांत्रिक बिघाड झाल्याने सध्या तरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि लाइव्ह स्ट्रीमिंगचा परवानगी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नव्या सुरक्षा उपाययोजनांसहीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा पुन्हा सुरु होईपर्यंत संबंधित पक्षकारांनी प्रत्यक्षात कोर्टामध्ये उपस्थित राहावं, असं कोर्टाने जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

सलग 2 दिवस असा प्रकार घडला

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झूम मिटींगच्या प्लॅटफॉर्मवरुन हायकोर्टातील सुनावणीचं कामाकाज करतं. सोमवारी दुपारी झालेल्या एका सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर अश्लील व्हिडीओ प्ले झाला. त्यानंतर मंगळवारीही असाच प्रयत्न करण्यात आला. सलग 2 दिवस असा प्रकार घडल्याने सेवा रद्द करण्यात आली आहे. काही कोर्टरुममधील कारवाई युट्यूबवरही लाइव्ह स्ट्रीमिंग केली जाते. हायकोर्टाने 31 मे 2021 रोजी लाइव्ह स्ट्रीमिंग सुरु केली होती. काही महिन्यानंतर यासंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आला.

सेवा स्थगित

चिफ जस्टीस प्रसन्ना बी वराले यांनी, "दुर्देवाने काहीतरी छेडछाड केली जात आहे. या दुर्देवी घटनेनंतर कोर्टाने असा निर्णय घेतला आहे की सुनावणीच्या लाइव्ह स्ट्रीमिंगबरोबरच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सेवा तात्पुरती स्थगित केली जात आहे," असं सांगितलं. कोरोना काळापासून सुप्रीम कोर्टापासून ते हाय कोर्ट आणि अगदी स्थानिक कोर्टामध्येही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावण्या घेण्यात आल्या होत्या. मात्र या सुनावण्यांदरम्यान कधी योग्य कपड्यांमध्ये उपस्थित नसेलेले वकील तर कधी इंटरनेटसंदर्भातील समस्यांच्या बातम्याही समोर आल्या. मात्र अशाप्रकारे कोर्टाच्या कामात तांत्रिक छेडछाड करुन थेट पॉर्न व्हिडीओ लावण्यात आल्याचा प्रकार पहिल्यांदा घडला आहे.