पोस्टाची भन्नाट योजना; एकदा गुंतवणुक केल्यास व्याजातूनच होईल लाखोंची कमाई

Best Post Office Saving Scheme: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना घेऊन येतात. आत्ताही पोस्टाने ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 14, 2023, 02:08 PM IST
पोस्टाची भन्नाट योजना; एकदा गुंतवणुक केल्यास व्याजातूनच होईल लाखोंची कमाई title=
Post Office Best Saving Schemes invest in Time Deposit and earn lakhs

Best Post Office Saving Scheme: पोस्टात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतच्या नावाने गुंतवणुक करता येऊ शकते. आत्ताच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी आजही भारतातील नागरिकांचा सरकारी योजनांवर व पोस्टाच्या योजनांवर विश्वास आहे. पोस्टाकडून नागरिकांसाठी विविध सेव्हिंग स्कीमच्या योजना जाहिर केल्या जातात. काही योजनांमध्ये फक्त व्याजाच्या मदतीने लाखोंची कमाई केली जाऊ शकते. काय आहे या योजनेचे नाव आणि त्याची वैशिष्ट्यै जाणून घेऊया. 

पोस्टाच्या या विशेष योजनेचे नाव पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीम आहे. पाच वर्षांपर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणुक करु शकता त्यानंतर परतावाही खूप चांगला मिळतो. या योजनेचा व्याजदरही चांगला आहे. एकदा का तुम्ही यात गुंतवणुक केल्यास तुम्हाला 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळतो. सरकारकडून दर तीन महिन्यांनी व्याजदर सुधारित करण्यात येतो. 1 एप्रिल 2023 रोजी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेमध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध व्याजदरात सुधारणा करण्यात आली होती. 7 टक्क्यांवरून 7.5 टक्के व्याजदर वाढवण्यात आले होते. 

व्याजदर जास्त असल्याने व परतावा चांगला मिळत असल्याने गुंतवणुकदारांमध्ये अल्पावधीतच ही योजना लोकप्रिय झाली आहे. पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी गुंतवणुक करु शकता. जर तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळेल, तुम्ही 2 किंवा 3 वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला 7 टक्के व्याज मिळेल आणि पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के व्याज मिळेल. मात्र, ग्राहकाची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत पैसे दुप्पट होण्याचे गणित समजून घ्या. पाच वर्षांपर्यंत ग्राहकांने जर 5 लाखापर्यंतचे पैसे गुंतवले तर त्यावर 7.5 टक्के व्याज मिळते. त्या हिशोबाने 2,24,974 रुपयांचे व्याज मिळेल. आणि गुंतवणुक केलेली रक्कम मॅच्युर झाल्यानंतर 7,24,974 रुपये इतकी होईल. त्यामुळं या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला हमखास लाखो रुपयांची कमाई होईल. 

टाईम डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या बचत योजनेत एकल खाते किंवा संयुक्त खाते उघडता येते. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते त्याच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येते. यामध्ये किमान 1,000 रुपयांमध्ये खाते उघडता येते. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर जोडले जातात.