President Election: शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सूचवली ही 2 नावे

विरोधी पक्षाकडून एकच उमेदवार देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना बैठकीला बोलवले होते.

Updated: Jun 15, 2022, 07:02 PM IST
President Election: शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सूचवली ही 2 नावे title=

मुंबई : देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी डाव्या पक्षांनी महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांचे नाव सुचवले आहे. मात्र, याचा विचार करण्यासाठी त्यांनी आणखी वेळ मागितला आहे. शरद पवार यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी नकार दिल्यानंतर डाव्या पक्षांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी यांचे नाव घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली विरोधी पक्षनेत्यांची बैठक दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये पार पडली. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी समान उमेदवाराचा विचार करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची संयुक्त बैठक बोलावली होती. 

विरोधी पक्षनेत्यांनी आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत समान उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. टीएमसी प्रमुख म्हणाल्या की आज येथे अनेक पक्ष होते. आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही एकच उमेदवार निवडू. या उमेदवाराला सर्वांचा पाठिंबा राहील. आम्ही इतरांशी सल्लामसलत करू. ही चांगली सुरुवात आहे. आम्ही अनेक महिन्यांनी एकत्र बसलो. आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी फारुख अब्दुल्ला आणि गोपालकृष्ण गांधी यांची नावे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी उमेदवार म्हणून सुचवली आहेत.

आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत समान्य उमेदवार उभा करण्याचा ठराव विरोधी पक्षनेत्यांनी मंजूर केल्याचे सुधींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. एक उमेदवार, जो प्रत्यक्षात संविधानाचा संरक्षक म्हणून काम करू शकतो आणि मोदी सरकारला भारतीय लोकशाही आणि भारताच्या सामाजिक बांधणीचे आणखी नुकसान होण्यापासून रोखू शकतो.

ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात 22 विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि बिगर-भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 15 जूनच्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती.

आजच्या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस नेत्यांसह डावे पक्षही सहभागी झाले होते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत अनेक पक्ष सहभागी झाले नाहीत. यामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), ज्याचे नेतृत्व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव करतात. यासोबतच अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष ही या बैठकीपासून लांब राहिला.

आजच्या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पवार यांच्या पक्षाने ते राष्ट्रपती भवनाच्या शर्यतीत असण्याची शक्यता खोडून काढली आणि काही विरोधी पक्षांनी संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाला पाठिंबा दिला असतानाही ते निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याचा हवाला देत पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्वत:ला राष्ट्रपती भवनापुरते मर्यादित ठेवू इच्छित नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात ते व्यस्त आहेत.

देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. खासदार आणि आमदारांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजचे ४,८०९ सदस्य रामनाथ कोविंद यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी सज्ज आहेत.