पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स संमेलनासाठी ब्राझीलमध्ये दाखल

चर्चेदरम्यान, व्यापार आणि दहशतवाद मुद्द्यावर मोदींचा भर

Updated: Nov 13, 2019, 09:59 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स संमेलनासाठी ब्राझीलमध्ये दाखल
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : ब्राझीलमध्ये आज सुरु होणाऱ्या ब्रिक्स संमेलनात (BRICS) सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल झाले आहेत. ब्राझीलला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी, चारही देशांच्या नेत्यांसमवेत व्यापक सहकाराच्या विविध विषयांवर चर्चा होण्याची आशा व्यक्त केली आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर.एम बोल्सनारोसह भारत-ब्राझिल धोरणात्मक भागीदारी वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत, 'मी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स संम्मेलनामध्ये सहभागी होणार आहे. संम्मेलनाची थीम 'भविष्यातील आर्थिक वृद्धि' ही आहे. ब्रिक्स नेत्यांसमवेत विविध विषयांवर व्यापक सहकार्यासंदर्भात चर्चेची अपेक्षा आहे' असं ते म्हणाले.

ब्राझीलची राजधानी ब्रासीलियामध्ये आयोजित होणाऱ्या संमेलनात पंतप्रधान मोदी यांचे लक्ष, दहशतवादविरोधी सहकार्य वाढवण्यावर असणार आहे.

ब्रिक्स संमेलनाशिवाय, मोदी ब्रिक्स व्यापार फोरमला संबोधित करतील. तसंच ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हल्पमेन्ट बँक अधिकाऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. 

  

ब्रिक्स ही जगातील पाच उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या संघटनेची एक पदवी आहे. यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका या देशांचा समावेश आहे.