Nirav Modi Bank Balance: नीरव मोदीचे बुरे दिन! बँक खातं झालं रिकामं, पिझ्झा खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत

Nirav Modi Bank Balance: देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला (Nirav Modi) आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. नीरव मोदीच्या खात्यात आता फक्त 236 रुपये आहेत. लंडन पोलिसांनी (London Bank) नीरव मोदीला अटक केलेली असताना दुसरीकडे आता त्याच्याकडे पिझ्झा खरेदी करण्याइतकेही पैसे उरलेले नाहीत.   

Updated: Mar 19, 2023, 07:58 PM IST
Nirav Modi Bank Balance: नीरव मोदीचे बुरे दिन! बँक खातं झालं रिकामं, पिझ्झा खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत title=

Nirav Modi Bank Balance: पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) ११ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा करुन फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) आता आर्थिक संकटात सापडला आहे. एकेकाळी कोट्यवधींचा मालक असलेल्या नीरव मोदी आता दिवाळखोरीचा सामना करत आहे. नीरव मोदीच्या खात्यात आता फक्त काही मोजके पैसे उरले आहेत. यामुळे सध्या तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. लंडन पोलिसांनी 2019 मध्ये अटक केल्यानंतर त्याचे वाईट दिवस सुरु झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

रिपोर्टनुसार, नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (FDIPL) कंपनीच्या खात्यात फक्त 236 रुपये आहेत. याचं कारण म्हणजे कोटक महिंद्रा बँकने इन्कम टॅक्स थकबाकीपोटी एसबीआय बँकेला 2.46 कोटी ट्रान्सफर केले आहेत. तर दुसरीकडे युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राने एकूण देय रकमेचा काही भाग हस्तांतरित केला आहे.

कंपनीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या लिक्विडेटरने विशेष कोर्टाकडे पैसे दिले जावेत यासाठी विनंती केली आहे. 2021 मध्ये कोर्टाने Fugitive Economic Offenders Act अंतर्गत FDIPL साठी नियुक्त केलेल्या लिक्विडेटरद्वारे दावेदार पंजाब नॅशनल बँकेला रक्कम जारी केली जावी असे निर्देश दिले होते.

विशेष कोर्टाने युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राला तीन महिन्यात आपल्या निर्देशाचं पालन करण्याचा आणि पैसे लिक्विडेटरच्या खात्यात ट्रान्सफर करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान दोन्ही बँकांनी आदेशाचं पालन केलं नसल्याचं बँकेच्या निदर्शनात आलं आहे. लिक्विडेटर्सने कोर्टात माहिती दिली की, त्यांनी युनिअन बँक ऑफ इंडियाला कंपनीच्या खात्यात पडून असलेली रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितलं होतं. पण बँकेने आमच्या ई-मेलला उत्तर दिलं नाही. बँकेने फक्त 17 कोटी ट्रान्सफर केले असून उर्वरित रक्कम दिलेली नाही. 

गेल्या आठवड्यात आलेल्या एका रिपोर्टमनुसार, नीरव मोदीने आपल्याकडे कोणताही पैसा नसून, कोर्टाच्या कारवाईसाठी लागणारे 1.5 कोटी रुपयेही उधारीवर घेत आहे असा दावा केला आहे. जेव्हा कोर्टाने त्याला तू खर्च कसा भागवतोस? असं विचारलं तेव्हा नीरव मोदीने सांगितलं की, प्रत्यार्पण प्रक्रियेचा भाग म्हणून माझी भारतातील संपत्ती जप्त करण्यात आली असल्याने आपण उधारी घेत आहोत. आपल्याकडे पैशांसाठी जास्त मार्ग उपलब्ध नसल्याचं त्याने कोर्टाला सांगितलं. 

नीरव मोदीविरोधात भारतात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पहिले प्रकरण पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणुकीशी संबंधित आहे. दुसरं प्रकरण पीएनबीची फसवणूक केल्यानंतर मिळालेल्या पैशांच्या कथित मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. तर, तिसऱ्या प्रकरणात सीबीआयच्या कारवाईशी संबंधित पुरावे आणि साक्षीदारांशी छेडछाड केल्याचा आरोप आहे.