46 वर्षानंतर जग्गनाथ पुरीमधील रत्नभांडार... साप करतात या खोलीचं रक्षण, आतमध्ये सोनं, चांदी अन् मौल्यवान रत्न?

Jagannath Puri Mandir Ratna Bhandar: जग्गनाथ पुरी यांच्या मंदिरातील रत्नभांडार आज खुलं करण्यात येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 14, 2024, 09:00 AM IST
46 वर्षानंतर जग्गनाथ पुरीमधील रत्नभांडार... साप करतात या खोलीचं रक्षण, आतमध्ये सोनं, चांदी अन् मौल्यवान रत्न? title=
Puri Jagannath Temples Ratna Bhandar set to be opened after 46 years

Jagannath Puri Mandir Ratna Bhandar: ओडिशाच्या पुरी येथील श्रीजगन्नाथ मंदिरातील रथयात्रा अलीकडेच पार पडली. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणते रत्नभांडाराकडे. तब्बल 46 वर्षांनी ओडिशातील रत्नभांडार खोलण्यात येणार आहे. लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांमध्ये पुरीतील रत्नभांडार हा महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्यावेळी आश्वासनदेखील दिले होते. 

ओडिशाचे कायदेमंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नभांडाराची दुरुस्ती आणि मोजणीसाठी विविध समितीची स्थापना करण्यात आली आहे. रत्नांची मोजणी सुरू असताना रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधीदेखील उपस्थित असणार आहेत. 12 व्या दशकातील या मंदिराचा रत्नभंडार शेवटचा 1978 रोजी खुला करण्यात आला होता. त्यावेळी या खजिन्यात असलेले दागिने आणि रत्न याची मोजणी करण्यासाठी जवळपास 72 दिवस लागले होते. मात्र, यंदा तंत्रांच्या सहाय्याने मोजणीचे दिवस कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या कामाच्या वेळी देवाच्या दर्शनाच्या वेळेत काहीही त्रास होणार नाहीये. 

रत्न भंडार संनियंत्रण समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती विश्वनाथ रथ यांनी सांगितले की, रत्नभंडार दुपारी खोलण्यात येईल. रत्नांभंडाराचे कुलूप चावीने उघडले गेले नाही तर कुलूप तोडण्यात येणार आहे. तसंच, आतमध्ये सापांचा वावर असल्याने सर्प मित्रांना व वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहे. तर अन्य एका सेवकाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वच जण या प्राचीन मंदिरातील रत्नभांडारमध्ये काय आहे, हे पाहण्यास उत्सुक आहेत. मात्र आत असलेल्या सापांमुळं काहीशी भीतीदेखील मनात आहे. 

जग्गनाथ हेरिटेज कॉरीडोर प्रकल्पाच्या सौंदर्यीकरणादरम्यान मंदिराच्या आसपास सापदेखील मिळाले होते. प्राचीन मंदिर असल्याकारणाने ठिकठिकाणी लहान लहान भेगा पडल्या आहेत. त्यामुळं या भेगांमध्ये साप असू शकतात. त्यामुळं रत्नभांडार खोलण्यात येत असताना सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. असं म्हणतात की साप या खजिन्याची रक्षण करतात. 

खजिन्यात काय?

श्री जग्गनाथ मंदिराच्या रत्नभांडाराची शेवटची मोजदाद 1978 साली झाली होती. श्री जग्गनाथ मंदिर प्रशासन (STJA)कडून जारी झालेल्या एका रिपोर्टनुसार, रत्नभंडारमध्ये तीन कक्ष आहेत. त्यातील सर्वात आतील कक्षात ठेवलेले दागिने कधीच वापरण्यात आलेले नाहीत. तर, बाहेरील कक्षातील दागिने विशेष दिवस व सण यासाठी बाहेर काढले जातात. देवाच्या रोजच्या पूजेसाठी सर्वात पहिल्या कक्षातील दागिन्यांचा वापर केला जातो. सर्वात आतील कक्षात, 50 किलो 600 ग्रॅम सोनं आणि 134 किलो 50 ग्रॅम चांदी आहे. तर, बाहेरील कक्षात 95 किलो 320 ग्रॅम सोनं आणि 19 किलो 480 ग्रॅम चांदी आहे. वर्तमान कक्षात 3 किलो 480 ग्रॅम सोनं आणि 30 किलो 350 ग्रॅम चांदी आहे. 

एका रिपोर्टनुसार, गेल्या शतकात जग्गनाथ मंदिराचे रत्न भांडार 1905,1926 आणि 1978 मध्ये उघडण्यात आले होते. तेव्हा तेथील मोल्यवान वस्तुंची यादी करण्यात आली होती. 1978 मधील एका सर्वेक्षणानुसार रत्न भंडारमध्ये 149 किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आणि 258 किलो चांदीची भांडी असल्याचे राज्य सरकारने सांगितले होते.12,831 वजनाचे सोन्याचे दागिने होते, ज्यात मौल्यवान रत्नही जडले होते. 22,153 जड चांदीची भांडी आणि इतर अनेक वस्तू होत्या. असं म्हणतात हे सर्व दागिने राजे-महाराजांनी देवाला दान केले होते.