मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.वीरप्पा मोईली यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे पक्षांतर्गत निवडणुकीच्या प्रक्रियेतून पक्षाचा अध्यक्ष होण्यास प्राधान्य देतील. पुढील महिन्यातच राहुल गांधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील, असे संकेतही मोईली यांनी दिले आहेत.
राहुल यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यास पक्षाचे चित्र बदलून जाईल, असे मोईली म्हणाले. पक्षाने सांगितले तर कार्यकारी जबाबदारी सांभाळण्यास आपण तयार असल्याचे राहुल यांनी नुकतेच म्हटले होते.
राहुल यांनी तत्काळ अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पक्षासाठी व देशासाठी हा निर्णय चांगला असेल. काँग्रेसमधील प्रत्येकाला वाटतं की, त्यांनी अध्यक्षपदी येण्यास उशीर केला आहे. आता ते संघटनात्मक निवडणुकीची वाट पाहत आहेत. त्यांना निवडणुकीच्या माध्यमातूनच अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्षपद मिळवायचे आहे, असे ते म्हणाले.
राज्यांमधील अंतर्गत निवडणूक प्रक्रिया या महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर निवडणुका होतील. पुढील महिन्यात ते अध्यक्ष होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसच्या चांगल्या प्रदर्शनासाठी काय करण्याची गरज आहे असे विचारले असते ते म्हणाले, राहुल गांधी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रत्येक राज्याशी संबंधीत समस्या सोडवायच्या आहेत.
कारण प्रत्येक राज्याच्या समस्या दुसऱ्या राज्यापेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे अशावेळी राज्यांनुसार रणनिती अवलंबण्याची गरज आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे केले जाणार आहे. यामागे राहुल यांचा एक नवा दृष्टीकोन आणि नवीन पद्धत आहे, असेही मोईली यांनी म्हटले.