Rahul Gandhi Disqualified : केरळमधल्या वायनाडमधले काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सदस्यता रद्द करण्यात आली आहे. लोकसभा (Loksabha) सचिवालयाने शुक्रवारी याप्रकरणी अधिसूचना काढत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याचं घोषित केलं. मोदी आडनाव (Modi Surname Case) प्रकरणात सूरत सेशन कोर्टाने (Surat Session Court) राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मानहानी प्रकरणात IPC कलम 499 आणि 500 अंतर्गत त्यांना दोषी ठरवण्यात आलं.
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटक निवडणुकीत एका रॅलीत (Karnatak Election Rally) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 'सर्व चोरांची आडनावं मोदी का असतात?' असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. याविरोधात सूरत सेशन कोर्टात मानहानी याचिका दाखल करण्यात आली होती. गुजरातचे भाजप आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांनी मानहानीचा दावा ठोकला होता.
कायदा काय सांगतो?
मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. कायद्यानुसार खासदार किंवा आमदार यांना 2 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द केलं जातं. इतकंच नाही तर शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सहा वर्षांपर्यंत त्यांना निवडणुकही लढवता येत नाही.
राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
कोर्टात शिक्षा सुनावताना राहुल गांधी यांनी आपली बाजू मांडली होती. मी एक राजनेता आहे, भ्रष्टाचार होत असेल तर त्यावर आवाज उठवणं आपलं कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. माझ्या वक्तव्याने कोणचंही मन दुखावलं जाऊ नये हा आपला उद्देश नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी यांनी शिक्षा सुनावल्यानंतर एक ट्विटही केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हाच माझा देव आहे. त्यांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा झाली होती.
राहुल गांधी यांचं भाषण
13 एप्रिल 2019 कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधी यांनी नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनवा कॉमन का आहे? सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं? असं वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटले. यावर भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी मानहानी केस दाखल केली. राहुल गांधी यांचं वक्तव्य म्हणजे मोदी समाजाची बदनामी असल्याचा आरोप पूर्णेश मोदी यांनी केला.