बंगळुरु : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या कॅन्टीनचा उद्घाटन सोहळा झाला. यावेळी त्यांनी छोटेखानी भाषण केले. ते ५ मिनिटांचेच होते. मात्र, या भाषणात त्यांनी दोन चुका केल्याने काँग्रेस पदाधिकारी पेचात पडले.
कर्नाटकात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तयारीला सुरुवात केली. सिद्धरामय्या सरकारने आजपासून बंगळुरुमध्ये इंदिरा कॅन्टीन सुरु केली आहेत. या कॅन्टीनमधून ५ रूपयांत नाश्ता आणि १० रुपयांत जेवण मिळणार आहे. या कॅन्टीनच्या उद्घाटनप्रसंगी राहुल यांनी पाच मिनिटांचे भाषण केले. यावेळी त्यांनी चुका केल्या.
प्रथम त्यांनी 'इंदिरा कॅन्टीन' ऐवजी 'अम्मा कॅन्टीन' असा उल्लेख केला. त्यानंतर या उपक्रमाचे कौतुक करताना आणखी कॅन्टीन बंगळुरुच्या इतर शहरांतही सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस नेते पेचात सापडलेत.
Karnataka: Congress VP Rahul Gandhi takes a meal at the newly inaugurated Indira Canteen in Bengaluru. pic.twitter.com/h0agD1V4o5
— ANI (@ANI) August 16, 2017
तत्पूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, कर्नाटकला भूक मुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे. दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी राज्यात प्रत्येक महिन्याला गरिबी रेषे खालील (बीपीएल) व्यक्तींना 'अन्न भाग्य योजना' अंतर्गत ७ किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे. तसेच स्तनपान करत असलेल्या माता आणि गर्भवती महिलांसाठी मातृपूर्ण योजनेतंर्गत दररोज माध्यान्ह भोजन देण्यात येणार आहे. २ ऑक्टोबरपासून याचा विस्तार राज्यातील सर्व १२ लाखा अंगणवाड्यात करण्यात येणार आहे.