'वायुदल- संरक्षण खात्याचा राफेल खरेदीला आक्षेप नव्हता, असं संरक्षण मंत्र्यांनी सांगावं'

राफेल मुद्द्यावर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला राफेल व्यवहार प्रकरणी काही प्रश्न विचारलेत

Updated: Jan 4, 2019, 01:46 PM IST
'वायुदल- संरक्षण खात्याचा राफेल खरेदीला आक्षेप नव्हता, असं संरक्षण मंत्र्यांनी सांगावं' title=

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. राफेल मुद्द्यावर राहुल गांधी यांनी याबद्दल काही प्रश्न विचारलेत... पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तर देण्याची मागणी राहुल गांधींनी केलीय. पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी राफेल खरेदी व्यवहारावर संरक्षण खात्यानं आणि देशाच्या वायुसेनेनंही काही प्रश्न उपस्थित केल्याचे संकेत राहुल गांधींनी यावेळी दिलेत. 

राहुल गांधींचे सवाल...

- राफेल विमानाचा व्यवहार ५२६ करोड रुपयांवरून १६२६ करोड रुपयांवर कुणी नेला? हे दर नरेंद्र मोदींनी वाढवले की संरक्षण खात्यानं?

- हवाई दलानं १२६ विमानं मागितली होती... परंतु, केवळ ३६ विमानांची डील का करण्यात आली?

- अनिल अंबानी यांना कॉन्ट्रॅक्ट कुणी मिळवून दिलं?

- ३६ विमानांची जी नवीन डील तयार करण्यात आली त्यावर वायुदल आणि संरक्षण मंत्रालयाचा काही आक्षेप होता का? अशा पद्धतीचा आक्षेप घेणारी एखादी फाईल संरक्षण मंत्र्यांकडे नाही, असं मोदी सरकारनं ठामपणे सांगावं. 

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी हे प्रश्न मोदी सरकारला विचारलेत. शिवाय घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या सर्व संस्थांनी मोदी सरकारनं रबरस्टँप बनवून ठेवल्याची टीकाही काँग्रेसनं केलीय. राफेल गैरव्यवहार प्रकरणी 'सर्वोच्च न्यायालयात चुकीचं प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या सरकारला बरखास्त करा', अशी टीका आज काँग्रेसने केलीय. 

राहुल गांधी राफेलची डील १ लाख ३० हजार करोडची डील असल्याचं सांगत आहेत. तर अरुण जेटली यांनी मात्र हा एकूण व्यवहार ५८ हजार करोडचा असल्याचं सांगितलंय. यावर, 'सरकारनं अगोदर गोपनीय सांगून आता जेटली यांनी आता का ५८ हजार करोड रुपयांची डील असल्याचं म्हटलंय?' असा प्रश्न राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत विचारला होता. '५०० करोड रुपयांची विमानं मोदी सरकार १६०० करोडमध्ये का खरेदी करत आहे?' असाही सवाल राहुल गांधींनी विचारलाय.