Maharashtra Weather News : डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये झालेल्या हवामान बदलांचे पडसाद थेट नव्या वर्षातही सोबतच आल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार नव्या वर्षातही थंडीची प्रतीक्षा कायम राहणार असून, हा गारठा नेमका गेलाय तरी कुठं? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रावरही धुक्याची चादर असून सोबतीनं ढगाळ वातावरणामुळं येथील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाच काही अंशांची वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ क्षेत्र मात्र इथं अपवाद ठरणार असून, या भागात तापमानाच घट नोंदवण्यात येईल अशीही शक्यता पुढील 4 तासांसाठी वर्तवण्यात आली आहे.
पश्चिमी झंझावातामुळं हवामान प्रणालीमध्ये बदल झाले असून, उत्तरेकडील राज्यांमध्येही किमान तापमानात वाढ झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशातही थंडीचा प्रभाव तुलनेनं कमी झाल्यामुळं महाराष्ट्रावरही याचे परिणाम दिसत आहेत. देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर सातत्यानं सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा, समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवन प्रक्रियेतून निर्माण होणारे ढग आणि या साऱ्यामुळं महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागावरही ढगांचं सावट असल्यामुळं थंडीचा जोर कमी होताना दिसत आहे. पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहणार असून, किमान तापमान 15 अंशांच्या वर राहणार असून, कमाल तापमानाचा आकडा 33 ते 35 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
काश्मीरच्या खोऱ्यात थंडीचा कडाका वाढतच असून, इथं मंगळवारीसुद्धा पारा शून्यावर स्थिरावला. तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये तापमानात आणखी घट झाल्याचं पाहायला मिळालं. काश्मीरमधील अनेक भागांना हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही चित्र वेगळं नसल्याचं स्पष्ट होत आहे. तर, लडाखमध्ये तापमान उणे 19 अंशांवर पोहोचल्यामुळं येथील दूरवरच्या खेड्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.