Rs 30000 Salary 7 Crore Found In Raids: मध्य प्रदेशमधील एका सरकारी महिला अधिकाऱ्याच्या घरी टाकण्यात आलेल्या छाप्यात घबाड सापडलं आहे. पोलिस हाऊसिंग कॉर्परेशनमध्ये कार्यरत असलेली सब इंजिनियर हेमा मीणाच्या (Hema Meena) घरी कोट्यावधींची बेकायदेशीर संपत्ती सापडली आहे. हेमाचा पगार पाहता तिने मागील 13 वर्षांच्या नोकरीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त 15 ते 17 लाखांची कमाई केली असेल. मात्र तिच्या घरी सापडलेली संपत्ती पाहून छापा टाकणाऱ्या लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. छापेमारीच्या पहिल्याच दिवशी या महिला अधिकाऱ्याच्या नावे कमाईपेक्षा तब्बल 232 टक्के अधिक संपत्ती आढळून आली आहे.
भोपाळजवळच्या बिलखिरिया येथे हेमाच्या घराबरोबरच फार्म हाऊस आणि ऑफिसवर लोकायुक्त विभागाने छापेमारी केली आहे. पहिल्या दिवशी झालेल्या छापेमारीनंतर या छापेमारीतील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सापडलेल्या संपत्तीची मोजणी करण्यासाठी अनेक दिवस लागतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. पहिल्या दिवसाच्या छापेमारीमध्ये हेमाच्या घरी 7 कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे.
विशेष म्हणजे महिना 30 हजार रुपये पगार असलेल्या हेमाच्या घरी 30 लाखांचा टीव्ही छापेमारीदरम्यान आढळून आला. हेमाच्या घरामध्ये 100 हून अधिक लोखंडी पिंजरे आढळून आले असून त्यामध्ये वेगवेगळ्या देशी आणि परदेशी प्रजातीचे कुत्रे सापडले. या कुत्र्यांना चपात्या खाऊ घालण्यासाठी घरात दीड लाखांची चपात्या बनवायची मशीनही सापडली आहे. या बंगल्यामध्ये अनेक गाड्याही सापडल्या असून यापैकी अनेक गाड्यांची किंमत ही 10 लाखांहून अधिक आहे.
बंगल्यातील कर्मचारी एकमेकांशी बोलण्यासाठी चक्क वॉकी टॉकीचा वापर करायचे. हेमाच्या मालकीच्या या घरामध्ये मोबाईल जॅमर लावण्यात आले आहेत. 20 हजार स्वेअर फूट जमीनीवर बनवलेला हा बंगलाच 1 कोटी रुपयांचा आहे. या छापेमारीदरम्यान हेमाच्या नावाने भोपाळ, रायसेन आणि विदिशामधील अनेक गावांमध्ये जमीनी विकत घेण्यात आल्याचं दिसून येत आहे. या बंगल्यामध्ये पोलिस हाऊसिंग बोर्डाचं सरकारी सामानही आढळून आलं आहे.
मूळची रायसेन जिल्ह्यामधील चपना गावची हेमा ही शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आळी आहे. तिचे वडील आजही शेती करतात. पूर्वजांकडून मिळालेली थोडी जमीन त्यांच्या नावे होती. शेतीच्या जीवावर वडिलांनी हेमाला शिकवलं. त्यानंतर हेमाने इंजीनियर झाल्यावर वडिलांच्या नावाने अनेक एकर जमीन विकत घेतली. मात्र हेमाकडे एवढा पैसा नेमका कुठून आणि कसा आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी हेमाला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरु आहे.
2011 सालापासून हेमाने किती संपत्ती जमा केली आहे याचा तपास आता केला जात आहे. हेमा ही 2016 पासून पोलिस हाऊसिंग कॉर्परेशनमध्ये कार्यरत आहे.