Coromandel Express Derails: ओडिसात भीषण रेल्वे अपघात, आतापर्यंत 30 प्रवाशांचा मृत्यू

Train Accident: ओडीसातल्या बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिली. या धडकेनंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन खाली घसरले.

राजीव कासले | Updated: Jun 2, 2023, 09:46 PM IST
Coromandel Express Derails: ओडिसात भीषण रेल्वे अपघात, आतापर्यंत 30 प्रवाशांचा मृत्यू title=

Coromandel Express Accident: ओडिसातल्या (Odisha) बालासोरमध्ये (Balasore) शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंजल एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express Derails) आणि मालगाडीत धडक झाली. या धडकेनंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन खाली घसरले. यात आतापर्यंत 30 प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची माहिती आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. 

घटनास्थळावर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. संध्याकाळी 6.30 वाजण्याचादरम्यान हा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस चेन्नई सेंट्रल ते पश्चिम बंगालमधल्या हावडा दरम्यान धावते. दुपारी साधारण 3.15 मिनिटाने कोरोमंडल एक्स्प्रेस शालीमार स्टेशनवरुन (Shalimar Station) निघाली. पण ओडिसतल्या बालोसर इथल्या बहानागा स्टेशनजवळ वेगात असलेली एक्स्प्रेस मालगाडीला धडकली.

बचाव कार्याला वेग
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटना स्थळी दाखल झालं आहे. अतिरिक्त मदतीचा गरज भासल्यास SRC ला सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी होते. अपघातात अनेक प्रवासे अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकल्यानंतर एक्स्प्रेसचे जवळपास 17-18 डबे रुळावरुन खाली घसरले. यात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं. अंधार असल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. मोबाईलच्या फ्लॅशमध्ये बचावकार्य केलं जात आहे. अपघातामुळे या मार्गावरील सर्व ट्रेन्स थांबवण्यात आल्या आहेत. 

अपघातानंतर प्रशासनान इंमरजेंसी कंट्रोल रुमचा नंबर 6782262286 जारी केला आहे. याशिवाय 15 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचवण्यात आल्या आहेत. काही जखमींना सोरो सीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत 10 प्रवाशांना भरती करण्यात आलं आहे. एकाच मार्गावर दोन्ही गाड्या समोरासमोर आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सिग्नल चुकीमुळे एकाच रुळावर दोन गाड्या आल्याचंही सांगितलं जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अपघाताचं कोणतंही अधिकृत वृत्त देण्यात आलेलं नाही.

हेल्पलाइन नंबर 

- हावडा : 033-26382217

- खडगपुर : 8972073925, 9332392339

- बालासोर: 8249591559, 7978418322

- कोलकाता शालीमार: 9903370746