नवी दिल्ली : भारतीय रेल्वे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्रालयाच्या विभागाने सध्याची स्थिती सुधारण्यासाठी तिकीटांचे दर वाढवण्यासोबतच नियमही लागू केले होते. आता आणखी नवीन विचार समोर येत आहेत.
रेल्वेकडून आता विंडो सीटसाठी जास्त पैसे आकारण्याचा विचार सुरू आहे. म्हणजे तुम्हाला जर आता विंडो सीट हवी असेल तर जास्त पैसे मोजावे लागू शकतात. रेल्वेने प्रिमियम रेल्वेंमध्ये सीट बुकींगच्या आधारावर भाडे वसूल करण्यासोबतच तिकीट रद्द केल्यावर जास्त पैसे आकारण्याचा नियम आणला होता.
प्रिमियम रेल्वेंमध्ये फ्लेक्सी फेअर मॉडलमध्ये पीक ऑवरदरम्यान रेल्वेच्या तिकीटाची भाडेवाढ होते. म्हणजे जसजशी रेल्वेच्या प्रवासाची तारीख जवळ येते, तिकीटांची किंमत वाढते. या बुकींग मॉडेलमुळे रेल्वेला रेव्हेन्यूमध्ये फायदा तर झालाच पण, प्रवाशांची संख्या कमी झाली. आता रेल्वे उत्पन्न वाढवण्यासाठी विंडो सीटसाठी जास्त रक्कम वसूलण्याचा विचार करत आहे.
सध्या विंडो सीटसाठी रेल्वेकडून कोणतही अतिरिक्त शुल्क घेतलं जात नाही. तिकीट बुकींग दरम्यान प्रवाशांना लोअर आणि अप्पर बर्थसाठी निशुल्क पर्याय दिले जातात. पण विमानांनुसार आता विंडो सीटसाठी जास्त पैसे आकारण्यावर विचार सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वे फ्लेक्सी फेअरमध्ये बदल करण्याचा विचार सुरु आहे.
नव्या प्लॅनिंगनुसार रेल्वे पुढच्या सीटसाठी जास्त भाडं घेऊ शकते. या व्यतिरीक्त साईड बर्थसाठी घेतल्या जाणा-या शुल्कातही कपात होऊ शकते. रेल्वेकडून ‘ऑन आणि फॉन सीझन’ फॉर्म्यूला करण्याचाही विचार सुरू आहे.