आरटीआय कार्यकर्त्यावर भयानक हल्ला, हात तोडले, पायात खिळे ठोकले

या विषयाची माहिती मिळवणं आरटीआय कार्यकर्त्याला पडलं महाग, हल्लेखोरांनी निदर्यतेच्या सर्व सीमा पार केल्या

Updated: Dec 23, 2021, 04:31 PM IST
आरटीआय कार्यकर्त्यावर भयानक हल्ला, हात तोडले, पायात खिळे ठोकले title=

जयपूर :  दारु माफियांविरोधात तक्रार करणाऱ्या एका आरटीआय कार्यकर्त्यावर (rti activist) भयानक हल्ला करण्यात आला. राजस्थानमधील (rajasthan) बारमेर जिल्ह्यात एका आरटीआय कार्यकर्त्याने दारू माफियांविरोधात तक्रार करून ग्रामपंचायतीमध्ये आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती. यामुळे संतापलेल्या काही अज्ञातांनी आरटीआय कार्यकर्ते अमराराम गोदारा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. अमराराम गोदारा यांच्यावर जोधपूरमधल्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

आरटीआई कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर कारवाई
आरटीआय कार्यकर्ते अमराराम गोदारा यांनी दोन दिवसांपूर्वीच दारू माफियांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी अवैध दारु विक्रिविरोधात कारवाई केली. अवैध दारु विक्रिविरोधात अमराराम गोदरा सातत्याने पोलिसांना माहिती देत होते. याशिवाय त्यांनी पंचायत राज विभागातही दारु माफियांविरोधात तक्रार करुन कारवाईची मागणी केली होती.

दारु माफियांचा जीवघेणा हल्ला
यामुळे संतापलेल्या दारु माफियांनी अमराराम गोदारा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पश्चिम राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन परिसरात, आरटीआय कार्यकर्ता अमरराम यांचं अपहरण करून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी निदर्यतेच्या सर्व सीमा पार केल्या. हल्लेखोरांनी अमराराम यांच्या पायात खिळे ठोकले, त्यानंतर त्यांचे हातपाय तोडून गावाजवळील रस्त्याच्या कडेला फेकून दिले. 

अमरराम यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी काही लोकांनी आपलं अपहरण करत मारहाण केल्याची माहिती दिली.

धमकी मिळत असल्याची दिली होती माहिती
दरम्यान, हल्ला होण्याच्या एक दिवस आधीच आरटीआय कार्यकर्ते अमराराम यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचं म्हटलं होतं. याबाबत आपण पोलिसांनाही कळवले आहे,  मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन, असं त्यांनी यात म्हटलं होतं.

मानवाधिकारने मागवला अहवाल
राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष गोपाल कृष्ण व्यास यांनी पोलीस महासंचालक, उदयपूर उत्पादन शुल्क आयुक्त, बारमेरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना नोटीस बजावून याप्रकरणी २८ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. .

आरोपींना पकडण्यासाठी चार टीम
आरटीआई कार्यकर्ते अमराराम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून रुग्णालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक दीपक भार्गव यांनी म्हटलं आहे. तसंच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची चार पथकं तयार करण्यात आली आहेत.