राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबरमध्ये या स्टॉकमधून केली 170 कोटींची कमाई

एका ऑटो स्टॉकने ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना 170 कोटी रुपयांचा नफा दिला आहे.

Updated: Sep 28, 2021, 07:11 AM IST
राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबरमध्ये या स्टॉकमधून केली 170 कोटींची कमाई

मुंबई : सप्टेंबर महिन्यात केवळ एका ऑटो स्टॉकने ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना 170 कोटी रुपयांचा नफा दिला आहे. बिग बुल झुनझुनवाला यांचा टाटा मोटर्समध्ये हिस्सा आहे आणि या महिन्यात आतापर्यंत त्याचे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढले आहेत. टाटा मोटर्सचे शेअर्स 31 ऑगस्टला 287 रुपयांच्या किंमतीत बंद झाले, जे आता 332 रुपये प्रति शेअरवर पोहोचले आहेत.

टाटा मोटर्सच्या किमती निफ्टी ऑटोपेक्षा अधिक वाढले आहेत. या महिन्यात आतापर्यंत त्याचे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढले आहेत, तर निफ्टी ऑटो 5.5 टक्क्यांनी वाढला आहे. मार्केट तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हा स्टॉक आणखी वाढू शकतो आणि झुंझुनवाला यांचा नफा आणखी वाढू शकतो.

गेल्या वर्षी टाटा मोटर्समध्ये सुरू केली गुंतवणूक 

ऑगस्टच्या अखेरीस, झुंझुनवाला यांचा टाटा होल्डिंगमधील हिस्सा 1084.55 कोटी रुपये होता. त्यांच्याकडे या टाटा ऑटो कंपनीचे 3,77,50,000 इक्विटी शेअर्स आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या बदलामुळे आता त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सची किंमत 1,254.62 कोटी रुपयांवर गेली आहे.

या गणनेत असं मानलं गेलं की, जून 2021च्या अखेरीस त्यांनी टाटा मोटर्समध्ये ठेवलेल्या हिस्सेदारीत कोणताही बदल झाला नाही. झुनझुनवाला यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर 2020मध्ये टाटा मोटर्सचे 4 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. यानंतर त्यांनी आपला काही हिस्सा विकला, त्यानंतर एप्रिल-जून तिमाहीत त्यांना कंपनीचे 3.77 कोटी इक्विटी शेअर्स शिल्लक राहिले.