नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील भाजप आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला आहे. आमचा पक्ष भाजपसोबत आहे. मात्र, आम्ही मायावतींविषयी असली भाषा खपवून घेणार नाही. मायावती या दलित समाजातील खंबीर नेत्या आणि प्रशासक आहेत. माझ्या पक्षातील कोणी त्यांच्याविषयी असे वक्तव्य केले असते तर मी त्या व्यक्तीवर नक्कीच कारवाई केली, असती असे आठवले यांनी म्हटले.
भाजप आमदार साधना सिंह यांनी चंदौली येथील सभेत मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका केली होती. नी म्हटले की, मायावती या पुरुष आहेत का महिला हेच समजत नाही. सत्तेसाठी सन्मान विकणारी ही महिला तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट म्हणायला हवी. ज्या महिलेचे चीरहरण होते, ती महिला कधीच सत्तेसाठी पुढे येत नाही. मात्र, मायवती यांनी खुर्चीसाठी हा सारा अपमान गिळला, असे साधना सिंह यांनी म्हटले.
Union Min Ramdas Athawale on Sadhna Singh's(BJP) statement: Our party is with BJP, but we don't agree with disrespectful remarks against Mayawati.She is a strong lady of our Dalit community & a good administrator.I would've definitely taken action if it was someone from our party pic.twitter.com/Ghe808TVEv
— ANI (@ANI) January 20, 2019
१९९५ साली उत्तर प्रदेशात घडलेल्या गेस्ट हाऊस कांडच्या अनुषंगाने साधना सिंह यांनी ही टीका केली. उत्तर प्रदेशात १९९५ साली सपा आणि बसपा यांनी युती करून सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यावेळी मायावती सरकारमध्ये सहभागी नव्हत्या. कालांतराने दोन्ही पक्षांमधील दुरावा वाढत गेला. तेव्हा मायावती भाजपशी गुप्तपणे संधान साधत असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. अशातच २ जून १९९५ रोजी मायावती यांनी लखनऊ येथील गेस्ट हाऊसवर आमदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी सपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी गेस्ट हाऊसवर हल्ला केला होता. यामध्ये बसपाच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. त्यावेळी मायावती एका खोलीत जाऊन लपल्या होत्या. अखेर भाजप आमदार ब्रह्मदत्त द्विवेदी यांनी गेस्ट हाऊसमधून मायावतींना सहीसलामत बाहेर काढले होते.