Manish Sisodia Resignation Letter: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी राजीनामा दिल्याने केजरीवाल सरकारला धक्का बसला आहे. मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याकडे आपला राजीनामा (Resignation) सोपवला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दोन्ही नेत्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामे नायब राज्यपालांना पाठवले असून यानंतर ते पुढे राष्ट्रपतींकडे पाठवले जातील. दरम्यान मनिष सिसोदिया यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठवलेल्या राजीनाम्यात नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या....
आदरणीय मुख्यमंत्री,
तुमच्या नेतृत्वाखाली मला दिल्ली सरकारमध्ये सलग आठ वर्ष मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्व:तला भाग्यवान समजतो. दिल्लीकरांच्या आयुष्यात आनंद आणि सुख आणण्यासाठी गेल्या आठ वर्षात तुमच्या नेतृत्वात जे काम झालं, त्यात माझाही थोडा सहभाग आहे याचा मला आनंद आहे. गेल्या जन्मात मी काही सत्कर्म केलं असावं ज्यामुळे मला शिक्षणमंत्री म्हणून देवी सरस्वतीची सेवा करण्याची संधी मिळाली.
गेल्या आठ वर्षात मी पूर्ण मनाने आणि प्रामाणिकपणे काम केलं याची दिल्लीकरांना जाण आहे. माझ्या स्वर्गीय वडिलांनी मला नेहमी आपलं काम प्रामाणिकपणे आणि अखंडपणे पूर्ण करण्याची शिकवण दिली. मी सहावीत असताना माझ्या वडिलांनी मला श्रीकृष्णाचा एक सुंदर फोटो दिला होता. हा फोटो माझ्या बेडसमोर लावत त्यांनी रोज सकाळी उठल्यावर पाया पडायला सांगितलं होतं. या फोटोच्या खाली त्यांनी 'प्रामाणिकपणे आणि सचोटीने आपले कार्य पूर्ण करणे हीच कृष्णाची खरी उपासना आहे' असं लिहिलं होतं. सहावी ते बारावीपर्यंत मी रोज सकाळी उठल्यावर तो फोटो पाहत होतो आणि वडिलांनी खाली लिहिलेलं वाक्य वाचत होतो. माझ्या वडिलांनी हे लिहिताना फार विचार केला असावा असं मला वाटतं. माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणीमुळेच प्रामाणिकपणा आणि एकात्मता माझी मूल्यं आहेत. जगातील कोणतीही शक्ती माझा प्रामाणिकपणा कमी करु शकत नाही. आजही मला कितीही इच्छा झाली तरी मी अप्रामाणिक होऊ शकत नाही.
इतकी वर्षं मी प्रामाणिकपणा आणि एकात्मकपणे काम करत असतानाही माझ्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत हे दुर्दैवी आहे. हे आरोप खोटे आहेत हे माझ्या देवाला माहिती आहे. अरविंद केजरीवाल यांच्या खऱ्या राजकारणाला घाबरुन काही घाबरट आणि दुर्बळ लोकांनी आखलेला हा कट आहे. त्यांचं खरं टार्गेट मी नसून, तुम्ही आहात. कारण आज फक्त दिल्ली नाही, तर संपूर्ण देश तुमच्याकडे एक नेता म्हणून पाहत आहे, ज्यांच्याकडे व्हिजन आहे आणि त्याची अंमलबजावणी करत लोकांच्या आयुष्यात बदल घडवला जाऊ शकतो. आर्थिक संकट, गरिबी, बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचारसारख्या समस्या भेडसावत असताना अरविंद केजरीवाल यांच्याकडे देशातील करोडो लोक आशेने पाहत आहेत. केजरीवाल जे बोललात ते करतात अशा दृष्टीने लोक पाहत असतात.
माझ्याविरोधात एफआयर दाखल केला असून अजून दाखल करण्याची तयारी सुरु आहे. मी तुमची बाजू सोडावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ते मला घाबरवत आहेत, धमकावत आहेत, प्रलोभन देत आहेत. मी झुकण्यास नकार दिला असता त्यांनी मला अटक केली आहे. मला जेलची भीती वाटत नाही. सत्यासाठी लढा देत असल्याने जेलमध्ये जाणारा मी पहिला नाही. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना ब्रिटिशांनी खोट्या केसेसमध्ये जेलमध्ये टाकल्याच्या अनेक गोष्टी मी वाचल्या आहेत. त्यांना फासावरही लटकवलं होतं. हे सर्व लोक माझे आदर्श आहेत. यामुळे माझ्या मनात जेलमध्ये जाण्याची भीती नाही. माझ्यासोबत सत्य आहे त्यामुळे मी घाबरण्याची गरज नाही.
दिल्ली सरकारमधील अनेक विभागात मी प्रामाणिकपणे काम केलं आहे. दिल्लीमधील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची प्रार्थना माझ्यासह आहे. त्यांच्या आई-वडिलांचं प्रेम माझ्या पाठीशी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, दिल्लीमधील शिक्षणात क्रांती घडवणाऱ्य़ा हजारो शिक्षकांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. सत्य समोर आल्यानंतर सर्व आरोप खोटे आहेत हे सिद्ध होईल. पण आता त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. माझी आता मंत्रीपदी राहण्याची इच्छा नाही. काही काळासाठी मी माझा राजीनामा देत आहे. माझा हा राजीनामा स्वीकारुन काही वेळासाठी मला जबाबदारीतून मुक्त करावं.
तुम्हाला आणि मला त्रास देण्यासाठीच कट रचणारे मला जेलमध्ये टाकत आहेत. पण यामुळे आपल्या सत्याच्या राजकारणाला बळच मिळेल. ते आपल्या सहकाऱ्यांना जेलमध्ये बंद करु शकतात पण आकाशाला गवसणी घालण्यापासून रोखू शकत नाहीत. मला वाटतं मी तुरुंगात गेल्याने आपल्या सहकार्यांचे मनोबल वाढेल तसंच देशासाठी काहीतरी करण्याची भावना वाढेल.
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है
शेवटी मी मंत्री असताना गेल्या आठ वर्षात माझ्यासह काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि दिल्ली सरकारमधील कर्मचाऱ्यांचे मला आभार मानायचे आहेत. त्यांच्या सहकाऱ्यामुळे मी माझी जबाबदारी पार पाडू शकलो. मी पुन्हा एकदा माझा राजीनामा स्वीकार करुन मला जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती करतो.