पंडित, मौलवी, शीख धर्मगुरु, पादरी, बौद्ध भिख्खूंना लष्करी नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता, अटी

Religious Teacher Job In Army: तुम्हाला ठाऊक आहे का भारतीय लष्करामध्ये 'ज्यूनिअर कमिशन्ड ऑफिसर रिलिजिअस टीचर (ऑल आर्म्स)' पदासाठी पंडित, मौलवी, शीख धर्मगुरु, पादरी, बौद्ध भिख्खूंची भरतीही केली जाते. या भरतीसंदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. यासाठी पात्रता काय लागते, कोणाला संधी दिली जाते, वयाची अट काय अशी सर्व माहिती जाणून घेऊयात..

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 9, 2023, 03:47 PM IST
पंडित, मौलवी, शीख धर्मगुरु, पादरी, बौद्ध भिख्खूंना लष्करी नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता, अटी title=
या पदांसाठी होणाऱ्या भरतीच्या अटी आणि शर्थीही नमूद केल्या आहेत

Religious Teacher Job In Army: भारतीय लष्करामध्ये अनेक पदांसाठी नोकरभरती केली जाते. यामध्ये सोलरज जनरल ड्यूटी, सोलजर टेक्निकल, सोलजर क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, सोलजर नर्सिंग असिस्टंट, शिपाई फार्मा, सोलजर नसर्सिंग असिस्टंट, सोलजर ट्रेड्समॅन यासारख्या पदांवरही नोकरभरती केली जाते. या सर्व पदांसाठी वेगवेगळी पात्रता आवश्यक असते. या पदांबरोबरच पंडित, मौलवी, शीख धर्मगुरु, पादरी, बौद्ध भिख्खूंची भरतीही भारतीय लष्कारात केली जाते.

आता पंडित, मौलवी, शीख धर्मगुरु, पादरी, बौद्ध भिख्खूंची भरतीसाठी शैक्षिणक पात्रतेची अट काय असते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या सर्व पदांची भरती अधिकृतरित्या म्हणजेच ऑन पेपर 'ज्यूनिअर कमिशन्ड ऑफिसर रिलिजिअस टीचर (ऑल आर्म्स)' या नावाने होते. अर्जदार व्यक्तीने कोणत्याही क्षेत्रामधील पदवीपर्यंतचं शिक्षण घेणं आवश्यक असतं.

वयाची अट किती?

पंडित, मौलवी, शीख धर्मगुरु, पादरी, बौद्ध भिख्खू पदासाठी 'ज्यूनिअर कमिशन्ड ऑफिसर रिलिजिअस टीचर (ऑल आर्म्स)' या जागेवर अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय 25 ते 34 वर्षांदरम्यान असणं बंधनकारक आहे. 

पंडित -

पंडित पदावरील भरतीमध्ये 2 जागा असतात. एक पंडित आणि दुसरी पंडित (गोरखा) पदासाठी संधी उपलब्ध आहे. पंडित (गोरखा) हे पद केवळ गोरखा रेजिमेंटसाठी असतं. या पदांवर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या हिंदू उमेदवाराला अर्ज करता येतो. संस्कृतमध्ये आचार्य किंवा संस्कृत पंडित म्हणून शिक्षण घेणं आवश्यक असतं. एका वर्षांचं अध्यात्मक शिक्षण घेणं आवश्यक असतं.

मौलवी -

मौलवी पदासाठीही भारतीय लष्करामध्ये भरती केली जाते. यामध्ये मौलवी आणि मौलवी (शिया) अशी 2 पदं असतात. यासाठी मुस्लीम उमेदवार अर्ज करु शकतात. अर्जदाराकडे पदवीचं शिक्षण आणि अरेबिक भाषेत मौलवी आलिम आणि उर्दू भाषेत अदिब आलिमची पात्रता असणं आवश्यक असतं.

शीख धर्मगुरु -

भारतीय लष्करामध्ये शीख धर्मगुरु म्हणून रुजू होण्यासाठी अर्जदाराकडे पदवीबरोबरच पंजाबी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

बौद्ध भिख्खू -

बौद्ध भिख्खूच्या पदासाठी अशी कोणतीही व्यक्ती अर्ज करु शकते ज्यांना उपयुक्त प्राधिकाऱ्यांनी बौद्ध भिख्खू किंवा बौद्ध पुजारी म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. नियुक्ती करणारी व्यक्ती त्या मठातील प्रमुख व्यक्ती असणं बंधनकारक आहे. मुख्य पुजाऱ्याकडे मठाने दिलेल्या योग्य प्रशस्तिपत्रकाबरोबरच खम्पा/लोपेन/रबजम गेशे (पीएचडी) ची पात्रता बंधनकारक आहे. 

पादरी -

पादरी पदासाठी उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेणं आवश्यक आहे. उपयुक्त प्राधिकाऱ्यांनी पुरोहित म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती यासाठी अर्ज करु शकते. तसेच ही मान्यता देणारी व्यक्ती सध्याच्या स्थानिक बिशपच्या यादीत असणं बंधनकारक असतं.