जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा कट; सुरक्षा यंत्रणांना वेळीच माहिती मिळाली आणि...

Jammu Kashmir Republic Day 2024: इथं देशात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही तिथं जम्मू काश्मीर भागातील तणावग्रस्त वातावरण काही कमी झालेलं नाही.   

सायली पाटील | Updated: Jan 26, 2024, 08:56 AM IST
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा कट; सुरक्षा यंत्रणांना वेळीच माहिती मिळाली आणि...  title=
Republic Day 2024 Terrorists Caught led jammu and kashmir baramulla

Jammu Kashmir Republic Day 2024: देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अर्थात 26 जानेवारी या दिवशी देशाच्या विविध भागांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आलेली असतानाही काही घटांकडून मात्र अराजकता माजवण्यासाठीच्या कुरापती सुरुच असल्याचं आता पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये दशहतवादी हल्ल्यांच्या धर्तीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, लष्कर आणि स्थानिक पोलीस यंत्रणांकडून या भागातही कडेकोट सुरक्षा तैनात असतानाही दहशतवादी कारवाया मात्र सुरुच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

प्रजासत्ताक दिन आणि तत्सम महत्त्वाच्या दिवशी मोठा घातपात घडवत देशात अस्थिरता माजवणाऱ्या या दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा एका मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता. पुलवामाच्या दक्षिण भागामध्ये आधुनिक स्फोटकं (IED) जप्त करण्यात आली. बोनियार, बारामुल्लामध्ये सुरक्षा यंत्रणांनी तीन दहशतवाद्यांना शस्त्रसाठ्यासह ताब्यात घेतलं. प्राथमिक माहितीनुसार या 2 ग्रेनेड, 2 पिस्तूल, 2 मॅगझिन आणि 24 गोळ्या जप्त करण्यात आल्या. हे दशहतवादी तांदळाच्या पाकिटांमधून हा शस्त्रसाठा लपवून नेत होते. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra weather News : वीकेंडला वाढणार थंडीचा कडाका; महाबळेश्वर, लोणावळ्यासह कोकणात काय परिस्थिती? पाहा 

सुरक्षा यंत्रणांनी जारी केला अलर्ट 

जम्मू काश्मीरमधील सदर घटनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हा अलर्ट जारी करण्यापूर्वी जम्मू-कश्मीरचे डीजीपी आरआर स्वैन यांनी एक उच्चस्तरिय बैठक बोलवली होती. जिथं त्यांनी काश्मीरमधील सर्वच कार्यक्रम स्थळांवर सुरक्षेच्या व्यवस्थेचा आढावा घेत यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. 

'पाकिस्तान आणि तेथील अनेक संघटना जम्मू काश्मीरमधील काही भागांमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असून, त्या धर्तीवर त्यांच्याकडून सातत्यानं घुसखोऱीचेही प्रयत्न केले जात आहेत', असं ते म्हणाले. या उच्चस्तरिय बैठकीमध्ये पोलीस यंत्रणा, लष्कर अधिकारी, सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी, सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सध्याच्या घडीला काश्मीरच्या खोऱ्यात शांतता राखण्यासाठी संरक्षणाच्या बाबतीत कोणतीही हयगय केली जात नाहीये.