मुंबई : कोरोनामुळे देशात सतत रुग्णांची संख्या वाढत आहे. स्पेनला मागे टाकत कोरोना या जागतिक महामारीच्या सर्वाधिक पीडित देशांमध्ये भारत आता पाचव्या स्थानी आला आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 9971 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 287 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोनाची लागण होण्याची संख्या 2,46,628 वर पोहोचली आहे. ज्यापैकी 1,20,406 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर 1,19,293 लोक बरे झाले आहेत.
अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या जवळपास 19 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये 5.84 लाखांहून अधिक, रशियामध्ये 3.3 लाख, ब्रिटनमध्ये 2.8 लाख, स्पेनमधील 2.4 लाख आणि इटलीमध्ये 2.33 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पेरूमध्ये 1.79 लाख, तुर्कीमध्ये 1.67 लाख आणि इराणमध्ये 1.60 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना संसर्गाच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टर गुलेरिया यांचा असा दावा आहे की ,कोरोना विषाणू अद्याप शिगेला पोहोचलेला नाही. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू शकतात.
कम्युनिटी ट्रान्सफरबाबत एम्सचे संचालक म्हणाले की, दिल्ली-मुंबई हॉटस्पॉट्स आहेत, तिथे आम्ही असे म्हणू शकतो की लोकल ट्रान्समिशन होत आहे. ही परिस्थिती संपूर्ण देशात दिसत नाही. 10 ते 12 अशी शहरे आहेत जिथे लोकल ट्रांसमिशन होण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणूमुळे देशभरातील लॉकडाउन आता हळूहळू अनलॉककडे वाटचाल करत आहे. ते म्हणाले की, लॉकडाऊनचा काही प्रमाणात फायदा झाला आहे. प्रादुर्भाव होण्यापासून काही प्रमाणात यश मिळालं आहे. पण लॉकडाउन उघडणे गरिबांच्या मदतीसाठी अनिवार्य झाले आहे.
डॉक्टर गुलेरिया म्हणाले की, लॉकडाउन उघडत असल्यास प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी ही वाढते. अशा परिस्थितीत लोकांना सामाजिक अंतर आणि मास्क वापरणं आवश्यक असेल.