तब्बल ११५ वर्षांनी उघडलं धौलपूरच्या महाराणाचं दालन; संपत्ती पाहून सारे थक्क

 ही दालनं जेव्हा खुली करण्यात आली तेव्हा....

Updated: Mar 10, 2020, 01:29 PM IST
तब्बल ११५ वर्षांनी उघडलं धौलपूरच्या महाराणाचं दालन; संपत्ती पाहून सारे थक्क
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : भारतामध्ये असणारी विविध संस्थानं या संस्थानांमध्ये असणारं काही शाही कुटुंबांचं वर्चस्व आणि त्यांच्याशी संबंधित काही रहस्यांविषयी अनेकांनाच कुतूहल असतं. सध्या असंच कुतूहल व्यक्त केलं जात आहे धौलपूरमधील दोन-तीन दालनांविषयी. कारण, तब्बल ११५ वर्षांनी ही दालनं खोलण्यात आली आहेत. 

धौलपूरच्या महाराणा शाळेत असणारी ही दालनं जेव्हा खुली करण्यात आली तेव्हा त्यात सापडलेली संपत्ती ही अनेकांना थक्क करुन गेली. या खोल्यांमधून जवळपास लाखभर पुस्तकसंपदा समोर आली. १९०५च्या पूर्वीच्या कालखंडातील ही पुस्तकं महाराज उदयभान यांच्या साठवणीतील असल्याचं म्हटलं जात आहे. महाराज उदयभान यांना दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह करण्याचा छंद होता. ब्रिटीश काळात ते लंडन आणि युरोप दौऱ्यावर जात असत तेव्हा तेव्हा प्रत्येक दोऱ्यातून परतत असताना ते तेथील पुस्तकं सोबत आणत असत. 

आता तुम्ही म्हणाल की पुस्ताकांचा हा संग्रह इतका खास का? तर, हा संग्रह अतिशय खास असण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे त्यातील कैक पुस्तकांमध्ये अक्षरं लिहिण्यासाठी शाईऐवजी सोन्याच्या पाण्याचा वापर करण्यात आला आहे. १९०५मध्ये या पुस्तकांची किंमत २५ रुपयांपासून ६५ रुपयांपर्यंत होती. त्यावेळी सोन्याची किंमत ही जवळपास २७रुपये प्रतितोळा इतकी होती. सध्याच्या घडीला या पुस्तकांची किंमत पाहता ती लाखांच्या घरात असल्याचं उघड होत आहे. 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 

dholpur treasure

भारत, लंडन आणि युरोपात छपाई झालेल्या या पुस्तकांमध्ये काही ३ फूट लांबीच्या पुस्तकांचाही समावेश आहे. ज्यामध्ये साऱ्या विश्वातील संस्थानांचे नकाशेही छापण्यात आले आहेत. ११५ वर्षांमध्ये या शाळेत अनेक शिक्षक, कर्मचारी बदलले. पण, कोणीही राजाशी संबंधित त्या खोल्या उघडल्या नाहीत. पण, जेव्हा ही दालनं उघडली गेली तेव्हा मात्र महाराजांशी संबंधित असणारा हा पुस्तकरुपी आणि खरीखुरी स्वर्णाक्षरं असणारा खजिना सर्वांनाच थक्क करुन गेला.