Russia-Ukraine War : संकटात असलेल्या युक्रेनला भारताकडून मदतीचा हात

Russia-Ukraine Conflict : भारताने पुन्हा एकदा मानवतेच्या दृष्टीकोनातून पुढे येऊन मदत केली आहे. रशियाकडून हल्ले होत असल्याने संकटात सापडलेल्या युक्रेनला भारताने ही मदत पाठवली आहे.

Updated: Mar 1, 2022, 11:30 PM IST
Russia-Ukraine War : संकटात असलेल्या युक्रेनला भारताकडून मदतीचा हात title=

नवी दिल्ली : रशियन सैन्याकडून होत असलेल्या हल्ल्यात युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही हल्ले सुरु असल्याने आणि हल्ल्यात जीवीतहानी वाढत असल्याने जगभरातील विविध देश युक्रेनच्या बाजुने उभे राहताना दिसत आहेत. युक्रेनवर वाढत असलेलं संकट पाहता भारताने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. (India send humanitarian relief and medicines to Ukraine )

भारताकडून युक्रेनला टेंट, चांदरी, सर्जिकल ग्लोव्हज, पाण्याची टाकी, स्लीपिंग मॅट, औषधं आणि जीवन उपयोगी वस्तूंची मदत पाठवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

यूक्रेन आणि रशिया यांच्यातील सुरु असलेल्या युद्धाचा आज सहावा दिवस होता. रशियाचं सैन्य युक्रेनच्या राजधानी जवळ पोहोचलं आहे. रशियाकडून आता आणखी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहर खाली करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.

मृतांचा आकडा वाढत चालला आहे. पण अजून ही दोन्ही देशांमध्ये कोणताही चर्चेचा मार्ग निघालेला नाही. युरोपमधील अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न सुरु केलाय. रशियाला एकटं पाडण्यासाठी अनेक देश युक्रेनला पाठिंबा देत आहेत. पण पुतीन यांना या गोष्टीचा काही फरक पडतोय असं दिसत नाही.

लोकं जीव वाचवण्यासाठी भूमिगत मेट्रो स्टेशन, बंकर आणि इतर जागेचा आश्रय घेत आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये जगण्याचा संघर्ष सुरु आहे.