गायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो, तर गायीवर हात फिरवल्यास...; BJP च्या मंत्र्याचा अजब दावा

Cow Cancer Cure: गायाच्या गोठ्यात झोपल्यामुळं कर्करोगावर मात करता येते, असा दावा भाजपच्या मंत्र्याने केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 14, 2024, 10:28 AM IST
गायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो, तर गायीवर हात फिरवल्यास...; BJP च्या मंत्र्याचा अजब दावा title=
Sanjay Singh Gangwar UP Minister says claim in cowshed can cure cancer

Cow Cancer Cure: भाजपचे मंत्री संजय गंगवार यांनी एक मोठा दावा केला आहे. संजय गंगवार हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत. संजय गंगवार यांनी केलेल्या दावा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना त्यांनी म्हटलं आहे की, 'गायीच्या पाठीवर सकाळ-संध्याकाळ हात फिरवल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात येईल. तुम्ही घेत असलेल्या गोळ्यांची संख्याही अर्ध्यावर येईल. तर गायीची सेवा 10 दिवस केली तर आत्ता तुम्ही 20 एमजीचे औषध घेत असाल तर फक्त 10 एमजीचेच औषध तुम्ही घ्यायला सुरुवात कराल.' 

संजय गंगवार यांनी केलेल्या या दाव्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तसंच, त्यांनी पुढे म्हटलं आहे की, मी आता जे काही सांगितलंय त्याची आधी चाचणी घेण्यात आली आहे. त्यांनी हे सांगताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र, मंचावर उपस्थित असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होतं. पुढे त्यांनी दावा केला की, कर्करोगाच्या रुग्णांनी गायीच्या गोठ्याची साफसफाई करण्यास सुरुवात करा. तिथेच झोपा यामुळं कर्करोगाचा धोका कमी होतो. कर्करोग बरादेखील होतो. 

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, गोसेवा हीच मोठी सेवा आहे. लोक गोशालामध्ये गायींसाठी दान करा. तुमच्या मुलांचा जन्मदिवसदेखील गोशालेत साजरा करा. यातून समाजात एक चांगला संदेश जाईल. राज्य मंत्री असलेले गंगवार हे रविवारी नगर पंचायत नौगंवा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कान्हा गोशालाचे लोकार्पण करण्यास पोहोचले होते. मात्र तिथेच त्यांनी कर्करोग आणि ब्लड प्रेशरचा उपाय सांगितला. त्यांनी पुढे म्हटलं की, शेण्याच्या गोवऱ्या जाळल्या तर मच्छरांपासून आराम मिळेल. मात्र, सध्या त्यांनी कर्करोगाबद्दल केलेल्या दाव्याची सर्वात चर्चा होतेय. 

गंगवार यांनी 2012मध्ये बसपाच्या तिकिटावर विधानसभा लढवली होती. मात्र, तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. 2017मध्ये ते भाजपमध्ये प्रवेश केला आणि पीलीभीतमधून जिंकले होते. 2022 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत बाजी मारली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात संधी मिळाली. गंगावर नेहमी भाजपचे नेते वरुण गांधी यांच्यावर निशाणा साधत असतात.