मुंबई : तुमचंही देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या गेलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय (SBI) बँकेत खातं असेल तर तुम्हालाही मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, एसबीआयला आपल्या ग्राहकांची संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यात अपयश आलंय. एका रिपोर्टनुसार, एसबीआयनं आपल्या महत्त्वपूर्ण सर्व्हरला सुरक्षित ठेवण्यात चूक केलीय. याचमुळे लाखोंच्या संख्येत बँक खात्यांची संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती सार्वजनिक होण्याचा धोका निर्माण झालाय. या सर्व्हरमध्ये बँक खात्यांच्या माहितीशिवाय खात्यात उपलब्ध असलेल्या बॅलन्सशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण सूचनाही होत्या.
Techcrunch नं जाहीर केलेल्या एका रिपोर्टनुसार, या संदर्भात एका शोधकर्त्यानं (resercher) सूचना दिली होती. त्यानंतर त्यानं याबद्दल विस्तृत माहिती मिळवण्याचा प्रयत्नही केला. शोधकर्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयकडून सर्व्हरला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणताही पासवर्ड दिला गेला नव्हता. अशावेळी कोणताही व्यक्ती हा डाटा सहज मिळवू शकतो.
परंतु, सर्व्हर कोणत्याही पासवर्डशिवाय किती काळ ओपन होता, हे मात्र समजू शकलेलं नाही. Techcrunch च्या या माहितीनंतर, एसबीआयकडून कोणत्याही पद्धतीनं प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला.
Techcrunch च्या रिपोर्टनुसार, एसबीआय सर्व्हरचा हा मोठा भाग SBI Quick होता. याद्वारेच बँकेकडून कोणत्याही खाते धारकांना फोन कॉल किंवा मॅसेज केला जाऊ शकतो. या सिस्टमद्वारे खात्याशी निगडीत सर्व माहिती तुम्ही आपल्या फोनवर मिळवू शकता, अशी माहिती बँकेच्या वेबसाईटवरही देण्यात आलेली आहे. उल्लेखनीय म्हणजे, सोमवारपासून बँकेकडून जवळपास ३० लाख मॅसेज धाडण्यात आलेत.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयमध्ये करोडो लोकांचे बँक खाते आहेत. अशावेळी Techcrunch चा हा रिपोर्ट या खात्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय.