देशातल्या बड्या बँकांची आणखी एक सेवा बंद होणार

देशातल्या बँकिंग सेवांमध्ये अनेक बदल केले जात आहेत.

Updated: Dec 4, 2018, 04:39 PM IST
देशातल्या बड्या बँकांची आणखी एक सेवा बंद होणार title=

मुंबई : देशातल्या बँकिंग सेवांमध्ये अनेक बदल केले जात आहेत. देशातली सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय)नं त्यांच्या ४ सेवा बंद केल्या. यानंतर आता एसबीआय आणखी एक सेवा १२ डिसेंबरपासून बंद करणार आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक या बँका १ जानेवारीपासून ही सेवा बंद करणार आहेत. चेकनी व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर ही सेवा बदलल्यामुळे फरक पडणार आहे.

इतर बँकांसाठी १ जानेवारीपासून नियम लागू

आरबीआयच्या आदेशानुसार १ जानेवारी २०१९ पासून बँका नॉन-CTS चेक क्लियर करणार नाहीत. पण एसबीआयनं मात्र १२ डिसेंबरपासूनच याची अंमलबजावणी करणार आहे. म्हणजेच १२ डिसेंबरपासून एसबीआयमध्ये नॉन-CTS चेक स्वीकारले जाणार नाहीत. १२ डिसेंबरपासून फक्त CTS चेकच क्लियर होतील. इतर बँकांसाठी हे नियम १ जानेवारीपासून लागू होतील.

३ महिन्यांपूर्वीच आरबीआयचे आदेश

आरबीआयनं ३ महिन्यांपूर्वीच नॉन-CTS चेक क्लियर न करण्याचे आदेश दिले होते. एसबीआयकडून त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना याबाबत मेसेजही पाठवण्यात आले होते. बँकेनी पाठवलेल्या या मेसेजमध्ये ग्राहकांना चेकबूक परत करून नवीन चेकबूक घेण्याचं आव्हान करण्यात आलं आहे. CTS म्हणजे चेक ट्रान्झकशन सिस्टिम. या सिस्टिमनुसार चेकचा इलेक्ट्रॉनिक फोटो काढला जातो. यामुळे बँकांना चेक दुसऱ्या बँकेमध्ये पाठवयाची गरज भासणार नाही.

खर्च कमी होणार

दुसऱ्या बँकांमध्ये चेक पाठवण्याचा खर्चही यामुळे कमी होणार आहे. तसंच चेक क्लियर व्हायलाही कमी वेळ लागणार आहे. नॉन-CTS चेक कॉम्प्यूटरला रिड करता येत नाहीत. त्यामुळे चेक एका बँकेच्या शाखेतून दुसऱ्या बँकेत पाठवावा लागतो, म्हणून चेक क्लियर व्हायला वेळ जातो. फक्त CTS-२०१० स्टॅण्डर्ड चेकबूकच ग्राहकांना द्या, असे आदेश आरबीआयनं याआधीही बँकांना दिले होते.