Loksabha Security Breach : संसदेत सर्वसामान्यांना कसा मिळतो प्रवेश? इथूनच 'ते' दोघं आत शिरले

Loksabha Security Breach : संसदेमध्ये झालेल्या गोंधळानंतर संपूर्ण देशातील राजकारणामध्ये एकच खळबळ माजली. देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा वास्तूमध्ये हा प्रकार घडूच कसा शकतो, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.   

सायली पाटील | Updated: Dec 13, 2023, 02:29 PM IST
Loksabha Security Breach : संसदेत सर्वसामान्यांना कसा मिळतो प्रवेश? इथूनच 'ते' दोघं आत शिरले  title=
Security Breach in Lok Sabha how does a person gets entry in parliament

Loksabha Security Breach : संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण झालेली असतानाच आणिदिवसाच्या आठवणी आजही अनेकांचं मन सुन्न करत असतानाच 13 डिसेंबरला पुन्हा एकदा देशाच्या संसदेत अशीच धक्कादायक घटना घडली आणि संसदेसारख्या वास्तूच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. 

दोन अज्ञात इसमांनी बुधवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास संसदेत एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संसदेचं कामकाज सुरु असतानाच या दोघांनी अचानक संसदेच्या बाकांवरून उड्या मारल्या आणि यामुळं तिथं एकच खळबळ माजली. राहिला प्रश्न सर्वसामान्य व्यक्ती इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना संसदेत येऊच कशी शकते. या दोन व्यक्तींचं इतकं धाडस का आणि कसं झालं? 

संसदेत तुम्हाआम्हीही जाऊ शकतो? 

संसदेच्या कामकाजादरम्यान सामान्य नागरिकांनाही सभागृहाच्या गॅलरीमध्ये जाण्याची परवानगी मिळते. यासाठी त्यांनी एक पास बनवून घेणं अपेक्षित असतं. संसद सचिवालयाच्या वतीनं हा पास बनवून दिला जातो. याशिवाय तुम्ही कोणत्याही खासदारासोबत संसदेमध्ये प्रवेश करु शकता. एखाद्या खासदाराशी तुम्ही यासंबंधी शिफारस करु शरता किंवा त्यांच्या सांगण्यावरूनही तुम्हाला संसदेत प्रवेश दिला जाऊ शकतो. इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे संसदेच्या सदस्याची शिफारस. संसदेत प्रवेश करण्यासाठीच्या या प्रक्रियेमध्ये प्रत्येक व्यक्तीचा वेगळा प्रवेश पास तयार केला जातो. जर कोणाला संसद पाहण्यासाठीच जायचं असेल तर, त्या मंडळींना वेगळ्या पाससाठी अर्ज करावा लागतो. संसदेचं कामकाज पाहण्यासाठीचा आणि फक्त संसद पाहण्यासाठीचा पास करण्याची प्रक्रिया एकसारखीच असते. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Security Breach : संसद परिसरातून अटक करण्यात आलेला तरुण महाराष्ट्रातला

संसदेची सुरक्षा व्यवस्था चोख... 

संसदेत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीची तपासणी होते. ज्यामध्ये सर्वप्रथम संसदेच्या प्रवेशद्वारावर तपासणी होते. इथं तुमचे फोन आणि तत्सम गोष्टी ठेवून घेतल्या जातात आणि त्यानंतर तुम्हाला संसदेत प्रवेश दिला जाईल. इथंही दोन स्तरांमध्ये तुमची तपासणी होते. तुम्ही लोकसभा किंवा राज्यसभेचं कामकाज पाहायला जाणार असाल तिथं तुमच्या नावाची रितसर नोंद असते. सभागृहात जाण्यापूर्वीसुद्धा तुमची तपासणी होते आणि त्यानंतर आतमध्ये प्रवेश दिला जातो. संसदेतील प्रेक्षक गॅलरी ही मुख्य सभागृहाच्या वर असते जिथून, सर्वसामान्यांना संसदेचं कामकाज पाहण्याची संधी मिळते. संसदेचे हे पास तासांच्या अनुषंगानं दिले जातात. 

संसदेत 'त्या' दोघांनी घुसखोरी केलीच कशी? 

13 डिसेंबर 2023 रोजी संसदेचं कामकाज सुरु असतानाच अचानक दोन अज्ञान इसमांनी सभागृहात प्रवेश करत उड्या मारण्यात सुरुवात केली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. इथं संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेला त़्यांनी शह कसा दिला हाच प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार ही दोन माणसं म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या लोकसभा विजिटर पासवरून सभागृहात पोहोचल्याची बाब उघड झाली. तिथं त्यांनी 'संविधान बचाओ', 'महिलांवरील अत्याचार थांबवा' अशा घोषणा त्या दोघांनी देण्यास सुरुवात केली असंही सांगितलं जात आहे.