Maharashtra Politics : भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये (Assam) पाठवले पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी विधानसभेत भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान कडू बोलत होते. बच्चू कडू यांच्या या सल्ल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
"खरे तर भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा," असे बच्चू कडू म्हणाले.
"रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ ते नऊ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर तिथे आम्हाला कळलं. जसं आपल्याकडं बोकडाचं मांस खाल्लं जातं. तसे, तिकडे कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं. त्यामुळे तेथील व्यापाऱ्याला बोलवून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. एक दिवसांत याच्यावर तोडगा निघेल. यासाठी तेथील सरकारशी बोलण्याची गरज आहे. याचा उद्योग होईल आणि ते घेऊन जातील. एकदाचा विषय संपवून टाका," असं बच्चू कडू म्हणाले.
दुसरीकडे, बच्चू कडू यांच्या वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ झाला आहे. आसाममधील स्थानिक लोकांना हे विधान आवडले नाही. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावर प्राणी हक्क कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कडू यांच्या सूचनेचे वर्णन अमानुष आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, झारखंडचे भाजप आमदार बिरांची नारायण यांनी नुकतेच लोकांवर हल्ले करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. जर राज्य सरकार या समस्येवर तोडगा काढू शकत नसेल तर नागालँडच्या लोकांना बोलवा आणि समस्या संपूण जाईल. बोकारो येथील भाजप आमदार बिरांची नारायण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत दावा केला होता की एकट्या रांचीमध्ये कुत्रा चावल्यामुळे 300 लोक दवाखान्यात पोहोचले होते.