नवी दिल्ली : आता काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतिलाल व्होरा यांना पक्षाचे हंगामी अध्यक्षपद दिले जाऊ शकते. त्यानंतर शिंदे किंवा व्होरांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस समिती नव्या अध्यक्षाची निवड करेल, असं मानले जात आहे. मात्र व्होरा यांनी ही शक्यता फेटाळली असून राहुल गांधी यांचे मन वळवण्याचा पुन्हा प्रयत्न केला जाईल, असं म्हटले आहे.
काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला. आज काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची दिल्लीत बैठक होणारेय. आज काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. राजीनामा जाहीर करताना राहुल गांधींनी अध्यक्ष निवडीत विलंब होत असल्यानं नाराजी व्यक्त केल्यावर आता काँग्रेसमध्ये अध्यक्ष निवडीच्या हालाचालीना वेग आला आहे. आज काँग्रेसचे सरचिटीणीस के सी वेणूगोपाल दिल्लीत परतणार आहेत. त्यामुळे आजच सकाळी हंगामी अध्यक्ष मोतीलाल व्होरांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीत अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बोलावण्याबाबत चर्चा होईल. आज कार्यकारिणीच्या बैठकीची तारीख ठरण्याची शक्यता असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी झी मीडियाला दिली आहे.
आपण आता काँग्रेस अध्यक्ष नाही, यापूर्वीच आपण राजीनामा दिला असून पक्षाच्या कार्यकारी समितीनं लवकरात लवकर नवा अध्यक्ष निवडावा, असं राहुल गांधींनी म्हटलंय. त्यांनी आपला राजीनामाच जाहीर केल्यामुळे पक्षासमोर नवा पेच निर्माण झालाय. राजीनामापत्र जाहीर केल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या ट्विटर हँडलवरून काँग्रेस अध्यक्ष या पदाचा उल्लेख काढून टाकलाय. त्यामुळे ते राजीनाम्यावर ठाम असल्यावर शिक्कामोर्तब झालं असून आता पक्षाला लवकरच नवा अध्यक्ष शोधावा लागणार आहे.