INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनी केलेल्या घोषणेमुळे एकच खळबळ; म्हणाल्या, 'देशात काय..'

Setback for INDIA alliance By Mamata Banerjee: ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचा उल्लेख करत थेट नाराजी व्यक्त करताना 'इंडिया' आघाडीला धक्का देणारा एक निर्णय जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेचा विरोधकांना फटका बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 24, 2024, 01:28 PM IST
INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनी केलेल्या घोषणेमुळे एकच खळबळ; म्हणाल्या, 'देशात काय..' title=
ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केली आपली भूमिका

Setback for INDIA alliance By Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाबरोबर झालेल्या मतभेदामुळे ममता बॅनर्जींनी किमान पश्चिम बंगालमध्ये तरी आपण एकटेच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र ममता यांचा हा 'एकला चलो रे'चा नारा 'इंडिया' आघाडीत फूट पाडणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये जागा वाटपासंदर्भात आपली काँग्रेसबरोबर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं स्पष्ट करताना मी राज्यात एकटीच लढणार हे आधीपासूनच म्हणत होते, असं विधान केलं आहे.

ममता नक्की काय म्हणाल्या?

"काँग्रेसबरोबर माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. मी नेहमीच पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकटे लढणार आहोत, असं म्हणत आलेली आहे. देशात काय केलं जाणार आहे या गोष्टीची मला चिंता नाही. मात्र आम्ही पश्चिम बंगालमधील एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत. आम्ही एकटेच भाजपाला पराभूत करु शकतो," असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु असल्याचं बोललं जात होतं. मात्र ममता बॅनर्जींनी आता काँग्रेसबरोबर आघाडी करुन किमान पश्चिम बंगालमध्ये तरी निवडणुकीला सामोरे जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

मी कोणताही शब्द दिलेला नाही

"काँग्रेसकडून जागावाटपासंदर्भात कोणताही शब्द देण्यात आलेला नाही. ते माझ्याशी काहीही बोलले नाहीत. ही शिष्टाचाराची बाब आहे की त्यांनी किमान मला सांगितले पाहिजे की ते येथे भारत जोडो यात्रेनिमित्त येत आहेत. राष्ट्रीय स्तरावर आमची भूमिका आम्ही नंतर ठरवू," असं ममतांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय.

आम्हाला काहीही कळवलं नाही

ममता यांच्या या विधानामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी एकत्र भारतीय जनता पार्टीविरुद्ध लढणार का याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. मात्र ममता बॅनर्जींनी यासंदर्भातही स्पष्ट केलं आहे. "मी इंडिया आघाडीचा घटक आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे. मात्र याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही," असं म्हणत ममतांनी आपली नाराजी व्यक्त केली. ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेचा विरोधकांना फटका बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये 'एकला चलो'चा नारा दिल्यानंतर या निर्णयासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया नोंदवली. ममता बॅनर्जी या लढवय्या आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच ठरेल, असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला.