मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP Chief) शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबतची परिस्थिती जवळपास स्पष्ट केली आहे. आपण अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षाचा चेहरा नसल्याचे त्यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत सांगितले. या शर्यतीत पवार आघाडीवर असल्याचे मानले जात होते. त्याचवेळी अनेक लहान-मोठे राजकीय पक्ष त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत असल्याच्या बातम्या होत्या. (Candidate for President election)
शरद पवार यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक घेतली. ते म्हणाले होते, 'मी शर्यतीत नाही, मी राष्ट्रपतीपदाचा विरोधी उमेदवार असणार नाही.' विशेष म्हणजे याच्या एक दिवसापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसनेही पवारांच्या नावाला पाठिंबा दर्शवला होता. दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी रविवारी त्यांची भेट घेतली.
कोणती नावे चर्चेत?
शरद पवारांनी नकार दिल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि G-23 गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांचीही नावे समोर येत आहेत.
ममता बॅनर्जींनी बोलवली बैठक?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात 15 जूनला बैठक बोलावली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एनसीपीच्या सूत्राने सांगितले की, "आवश्यक असल्यास, आम्ही बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना बळ देऊ, जे भाजपच्या विरोधात मजबूत उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत." भाजपसाठी रस्ता सोपा नसावा यासाठी त्यांना मोठ्या विरोधी पक्षांशी समन्वय साधायचा आहे.