Metro 9 Update: दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या सहा महिन्यात या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळं नव्या वर्षात 2025 पर्यंत या मेट्रोला पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे.
दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असणार आहे. तर काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान असा दुसरा टप्पा असणार आहे. 2009मध्ये या मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती. या मेट्रो 9 मार्गिकेची लांबी 13.6 किमी असून त्यावर 10 स्थानके आहेत. यापूर्वी मेट्रो मार्गिकेचे शेवटचे स्थानक मीरा-भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस स्टेडियम हे होते. मात्र या मेट्रोचे कारशेड राई मुर्धे येथून उत्तन येथे न्यावे लागल्याने मार्गिकेवर आणखी दोन स्थानकांची भर पडली आहे.
एमएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगावदरम्यानच्या मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. या मार्गातील कामे अंतिम टप्प्यात आहे. तर रुळांची कामे सुरू आहेत. आता यंत्रणेचीही कामे लवकरच सुरु केली जाणार आहेत. मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्यात 4 स्थानके असणार आहेत. दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव ही स्थानके असणार आहे.
विरार लोकलमध्ये गर्दी वाढत चालली आहे. वाढत्या गर्दीमुळं लोकलचा प्रवासही करणे कठिण होऊन बसते. मात्र, ही मेट्रो सुरू झाल्यामुळं दहिसर ते भाईंदर पर्यंत प्रवासी प्रवास करु शकतात. त्यामुळं लोकलमधील तितकीच गर्दी आटोक्यात येऊ शकते.
मेट्रो 9 मार्गिका मेट्रो मार्ग 2 ए (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो मार्ग (अंधेरी पूर्व ते दहिसर) पूर्वेला थेट जोडण्यात येणार आहे. तसंच, या मेट्रो मार्गिकेमुळं वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न रेल्वेला देखील जोडण्यात येईल.
मेट्रो 9 मार्गिकेवरील स्थानके दहिसर (पू) ते मीरा-भाईंदर)
1. दहिसर, 2. पांडुरंग वाडी, 3. मिरागाव, 4. काशीगाव, 5. साई बाबा नगर, 6. मेदितिया नगर, 7. शहीद भगतसिंग गार्डन, 8. सुभाषचंद्र बोस स्टेडियम
अंधेरी (पू) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
1. विमानतळ कॉलनी (उन्नत) आणि 2. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (भूमिगत)
दरम्यान, अलीकडेच मेट्रो लाइन दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर मार्गावरील वाहतूक परवानगीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मीरा भाईंदर) आणि मार्ग ७ अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून एमएमआरडीएला २२ कोटी रुपये कर्ज वितरीत करण्यात आले आहे.